रांजनोली नाक्याजवळील घटना
भिवंडी येथील रांजनोली नाक्यावर मंगळवारी सायंकाळी चहाच्या एका टपरीमध्ये गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याने सुमारे १३ जण गंभीर जखमी झाले असून त्यांना मुंबई तसेच ठाणे येथील शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी नेण्यात आले आहे. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.
कैलास इताडकर, अंजनाबाई इताडकर, शरद भोईर, जिजाबाई तरे, उषा म्हात्रे, महादेव भगत, इलियास, गुड्डू तिवारी, सोहराब अली, अल्लाउद्दीन शेख अशी गंभीर जखमींची नावे असून अन्य जखमींची नावे समजू शकली नाहीत.
भिवंडी येथील मुंबई-नाशिक महामार्गावरील रांजनोली नाक्यावर एक चहाची टपरी आहे. मंगळवारी सांयकाळी या टपरीमधील गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. त्यामध्ये १३ जण गंभीर जखमी झाले. यातील जखमी टपरीजवळ तर काही रिक्षाची वाट पाहात उभे होते.
तसेच या घटनेत जखमी झालेले इलीयास, गुड्डू तिवारी, सोहराब आणि अल्लाउद्दीन यांच्या टपरीच्या बाजूला भंगाराचे दुकान असून ते स्फोटात जळून खाक झाले आहे. या प्रकरणी कोनगाव पोलीस तपास करीत आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.