लालबाग गणेशगल्ली येथील ‘साराभाई’ या तीन मजली इमारतीतील एका घरात रविवारी सकाळी सिलिंडरचा स्फोट झाला. या दुर्घटनेत सुशीला बांगरे (वय ६२) यांचा मृत्यू झाला असून, १५ जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी १३ जणांची प्रकृती गंभीर आहे. हा स्फोट इतका भीषण होता की दोन घरांची भिंत कोसळली, तर चार घरांचे नुकसान झाले.

दुसऱ्या मजल्यावर अचानक गॅस गळतीचा वास येऊ लागला. गॅस गळती कुठून होते याचा शोध घेत असतानाच अचानक भीषण स्फोट झाला. या स्फोटामुळे दुसऱ्या मजल्यावरील चार घरांमध्ये मोठय़ा प्रमाणावर पडझड झाली. तसेच विजेच्या तारा, कपडे, घरातील सामानाने पेट घेतला. अग्निशमन दलाने ही आग अर्ध्या तासात विझवली.

दरम्यान, या सगळ्या रहिवाशांची तात्पुरती व्यवस्था जवळच्याच एका हॉटेलात करण्यात आली असून म्हाडाकडून इमारतीची तपासणी केल्यानंतर पहिल्या व तिसऱ्या मजल्यावरील लोकांना राहण्याची परवानगी दिली जाईल, अशी माहिती नगरसेवक अनिल कोकीळ यांनी दिली. तर म्हाडाच्या मदतीने इमारतीतील खोल्यांचे व शौचालयाचे जे नुकसान झाले आहे ते दुरुस्त करण्याकरिताही पाठपुरावा सुरू केला असल्याचे त्यांनी सांगितले.

१३ जणांची प्रकृती गंभीर

* लालबाग येथील गॅसगळती दुर्घटनेत जखमी झालेल्यांपैकी १२ जणांना केईएम रुग्णालयात तर चार जणांना मसिना रुग्णालयात दाखल करण्यात आले.  यातील एका महिलेचा मृत्यू झाला, तर १३ जणांची प्रकृती गंभीर आहे.

* केईएमध्ये उपचार सुरू असलेल्यांपैकी ९ जणांची प्रकृती गंभीर आहे. हे रुग्ण दाखल झाल्यावर यांच्यासाठी स्वतंत्र अतिदक्षता विभाग तयार करण्यात आला. प्लास्टिक सर्जरी, अस्थिरोग, छातीरोग, नेत्ररोग आणि नाक, कान आणि घसा रोग विभागासह शल्यचिकित्सकांच्या मार्गदर्शनासाठी यांच्यावर उपचार सुरू आहेत.

* बहुतांश रुग्णांच्या शरीरात धूर गेला असून त्याच्याही तपासण्या सुरू आहेत. एका रुग्णाच्या छातीला गंभीर मार लागला आहे. रुग्णांच्या करोना चाचण्याही करण्यात येणार असल्याचे रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख यांनी सांगितले.

* एकाच कुटुंबातील आई, वडील, मुलगा आणि मुलगी या अपघातात जखमी झाले असून त्यांना मसिना रुग्णालयात रविवारी सकाळी साडेसातच्या सुमारास दाखल करण्यात आले. वडील ९४ टक्के, तर मुलगा ९२ टक्के भाजले आहेत. आई आणि १३ वर्षांची मुलगी ६० टक्के भाजले आहेत. चौघांची प्रकृती गंभीर असून उपचार सुरू आहेत. करोनाच्या पाश्र्वभूमीवर योग्य ती काळजी घेत उपचार केले जात असल्याची माहिती मसिना रुग्णालय प्रशासनाने दिली आहे.

जखमींची नावे

प्रथमेश मुंगे (२७ वर्षे), रोशन अंधारी (४० वर्षे), मंगेश राणे (६१ वर्षे), महेश मुंगे (५६ वर्षे), ज्ञानदेव सावंत (८५ वर्षे) हे सहा जण ७० ते ८० टक्के भाजले असून त्यांची प्रकृती गंभीर आहे. तर विनायक शिंदे (७५ वर्षे), ओम शिंदे (२० वर्ष), यश राणे (१९ वर्षे), करीम (४५ वर्षे), मिहीर चव्हाण (२० वर्षे), ममता मुंगे (४८ वर्षे) ह सहा जण ३५ ते ५० टक्के भाजले आहेत.  हे सर्व जण केईएम रुग्णालयात दाखल आहेत. तर मसिना रुग्णालयात दाखल असलेले वैशाली हिमांशू (४४ वर्षे), त्रिशा (१३ वर्षे), बिपिन (५० वर्षे), सूर्यकांत (६० वर्षे) हे चार जण ७५ ते ९५ टक्के भाजले असून त्यांची प्रकृती गंभीर आहे.

लग्नघरात दुर्घटना

या इमारतीत राहणारे राणे यांच्या मुलीच्या लग्नाच्या हळदीचा कार्यक्रम रविवारी ठेवण्यात आला होता. राणे यांचा केटरिंगचा व्यवसाय आहे. त्याचे साहित्य ठेवलेल्या खोलीत त्यांचे मदतनीस झोपले होते. त्याच खोलीत स्फोट झाल्याचे समजते. यात राणे व त्यांचा मुलगा यश हेही भाजले आहेत, तर लग्न ठरलेली मुलगी ही दुसऱ्या खोलीत होती. त्यामुळे ती सुखरूप आहे, अशी माहिती रहिवाशांनी दिली.