राष्ट्रवादीकडून मुख्यमंत्र्यांची कोंडी
गेल्या वर्षी कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी दोन हजार कोटींचे पॅकेज दिले तसे या वर्षी सिलिंडरसाठी अडीच हजार कोटी खर्च करावेत, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसने मांडल्याने मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची चांगलीच कोंडी झाली आहे. यातून मार्ग काढण्याचे मुख्यमंत्र्यांचे प्रयत्न असून, या मुद्दय़ावर चव्हाण यांनी आज पुन्हा राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा केली. सफेद शिधापत्रिकाधारक ग्राहक वगळता बाकीच्यांना ही सवलत देण्यावर विचार सुरू झाला आहे.
सरसकट सर्वाना अनुदानाच्या रक्कमेत तीन सिलिंडर दिल्यास राज्याच्या तिजोरीवर २४०० कोटींचा बोजा पडणार असल्याने हा निर्णय घेण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी सावध भूमिका घेतली आहे. मुख्यमंत्र्यांची कोंडी करण्याकरिता राष्ट्रवादीने मग सरसकट सर्वाना तीन सिलिंडर मिळावेत, अशी मागणी पुढे रेटली. सर्वाना तीन सिलिंडर देण्याचा निर्णय झाल्यास त्याचे सारे श्रेय राष्ट्रवादीला मिळेल, अशी व्यवस्था पक्षाच्या नेत्यांनी केली आहे. तर सर्वाना ही सवलत देणे शक्य झाले नाही तर सारे खापर राष्ट्रवादीकडून मुख्यमंत्र्यांवर फोडले जाण्याची शक्यता आहे. या पाश्र्वभूमीवर गेल्या चार दिवसांत मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्याशी दोनदा या विषयावर सविस्तर चर्चा केली. आज सायंकाळी पुन्हा उभयतांमध्ये झालेल्या चर्चेत सिलिंडर हा विषय होता, असे सांगण्यात आले.
दारिद्रय रेषेखालील शिधापत्रिकाधारकांनाच तीन सिलिंडरची सवलत दिल्यास मध्यमवर्गात त्याची प्रतिक्रिया उमटू शकते, अशी काँग्रेसला भीती आहे. ३७१ रुपये एका सिलिंडरला अशा तीन सिलिंडरकरिता ग्राहकांना ११०० रुपयांचे धनादेश देण्याची मुख्यमंत्र्यांची योजना आहे. सफेद शिधापत्रिकाधारकांना ही सवलत देऊ नये. याऐवजी पिवळ्या आणि नारिंगी शिधापत्रिकाधारकांनाच ही सवलत दिल्यास बोजा कमी येईल, असा पर्याय पुढे आला आहे.
दिवाळीपूर्वी सिलिंडरचा निर्णय जाहीर केला जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. येत्या बुधवारी बहुधा या निर्णयाची घोषणा केली जाईल.