किशोरी आमोणकर यांना त्यांच्या संगीत क्षेत्रातील योगदानाबद्दल एसएनडीटी महिला विद्यापीठातर्फे डी.लिट. पदवी प्रदान करण्यात आली. विद्यापीठाच्या ६४व्या दीक्षांत सोहळय़ामध्ये कुलपती विद्यासागर राव यांच्याहस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले.
एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या ६४ वा दीक्षांत समारंभ शुक्रवारी पार पडला. या समारंभात पीएच.डी., एम.फिल., पदव्युत्तर पदवी, पदवी अभ्याक्रम यशस्वीपणे पूर्ण केलेल्या १५ हजार ६०० विद्याíथनींना पदवी आणि पदविका प्रदान करण्यात आल्या. यामध्ये ७० पीएच.डी. आणि १२ एम.फिल.चा समावेश आहे. या कार्यक्रमाला विद्यापीठाचे कुलपती सी.विद्यासागर राव, शिक्षणमंत्री विनोद तावडे, रेल्वेमंत्री सुरेश प्रभू, कुलगुरू डॉ. वसुधा कामत, किशोरी आमोणकर आदी मान्यवर उपस्थित होते.
समाजाच्या सर्वागीण विकास साधयाचा असेल तर  महिलांना आíथक आणि राजकीय क्षेत्रात अधिक संधी दिली पाहीजे असे मत प्रभू यांनी आपल्या भाषणात व्यक्त केले. तर लोकसभेत महिलांचे प्रतिनिधित्व वाढविण्यासाठी आरक्षण आवश्यक असल्याचेही ते म्हणाले. तसेच महिला सक्षमीकरणासाठीही ठोस उपाययोजना आखण्याची गरज असल्याचे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.
आपण जेवढे शिकू तेवढे आपले ज्ञान वाढत जाते, यामुळेच निरंतर शिक्षण घेत राहा असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.