पुणे- मुंबई द्रुतगती मार्गावर झालेल्या अपघातात जखमी झालेले प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक व पुण्याच्या डीएसके विश्व उद्योगसमूहाचे संस्थापक अध्यक्ष डी.एस.कुलकर्णी यांनी झालेल्या अपघातात चालक नीरज सिंग याचा बळी गेल्याप्रकरणी सरकारला जबाबदार धरले आहे.

कुलकर्णी यांनी आपल्या फेसबुक पेजवर आपली प्रकृती ठणठणीत असल्याची माहिती देणार एक व्हिडिओ अपलोड केला असून, या व्हिडिओमध्ये त्यांनी सरकारच्या आडमुठ्या धोरणामुळेच अपघातात माझा चालक जागीच ठार झाल्याचे म्हटले आहे. याशिवाय, आपली प्रकृत्ती उत्तम असून आज दुपारी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार असल्याची माहिती दिली आहे.

डी.एस.के म्हणाले की, २६ मे रोजी झालेल्या अपघातात मी वाचलो, पण माझा चालक नीरज सिंग याची मुंगी एवढीही चूक नसताना त्याचा बळी गेला. केवळ लालफितीच्या दिरंगाईमुळे आणि सरकारच्या आडमुठ्या धोरणामुळे रस्त्याचे चुकीचे डिझाईन करण्यात येते यामुळेच नीरजचा जीव गेला. देशात रस्त्यावर दरडी कोसळून, अपघातात माणसे कीड्यामुंग्यासारखी मरत आहेत. पण याचे कोणालाच काही पडलेले नाही. परदेशात हरीण मेले तरी दखल घेतली जाते. तुमच्या सगळ्यांच्या प्रेमामुळे मी वाचलो. बुधवारी मला डिस्चार्ज मिळणार असून पुढील आठवडाभराता कामाला सुरूवात करेन, असेही ते पुढे म्हणाले.