महाराष्ट्राच्या गावागावातून आपल्या मागण्या आणि अपेक्षांचं गाठोडं सोबत घेऊन मुंबईच्या दिशेने आलेल्या हजारो शेतकऱ्यांनी पाहता पाहता अखंड मुंबई व्यापली असंच म्हणावं लागेल. नाशिक येथून सुरु झालेला हा मोर्चा रविवारी रात्री उशिरा आझाद मैदानावर दाखल झाला. प्रचंड संख्येने मुंबापुरीत आलेल्या या अन्नदात्यांचं या शहराने मोठ्या उत्साहात स्वागत केलं. कुठे त्यांच्यासाठी अल्पोपहार केंद्र सुरु करण्यात आली, तर कुठे त्यांच्यासाठी पाणी, बिस्कीटांचं वाटप करण्यात आलं. यामध्ये मुंबईचे डबेवालेही मागे राहिले नाहीत.

कधीही न थकणाऱ्या या शहराची एक ओळख म्हणून उल्लेख केल्या जाणाऱ्या मुंबईच्या डबेवाल्यांनी आझाद मैदानावरील शेतकरी मोर्चात सहभागी झालेल्यांसाठी जेवणाची सोय केल्याचे पाहायला मिळाले. दादर ते कुलाबा या भागातून देणगी स्वरुपात खाण्याचे पदार्थ एकत्र करुन ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम डबेवाल्यांनी मोठ्या जबाबदारीनं हाती घेतलं. ‘रोटी बँक’ या उपक्रमाअंतर्गत त्यांनी हे पाऊल उचलल्याचं वृत्त ‘न्यूज १८’ ने प्रसिद्ध केलं.

PHOTOS : अन्नदात्यांचा शीख- मुस्लीमांनी असा केला पाहुणचार

याविषयीच अधिक माहिती देत ‘मुंबई डबावाला असोसिएशन’चे प्रवक्ते सुभाष तळेकर म्हणाले, ‘आम्ही या मोर्चात सहभागी झालेल्या, गावागावातून आलेल्या शेतकऱ्यांच्या खाण्यापिण्याची सोय करण्याचा निर्णय घेतला. कारण, तेच आपले अन्नदाते आहेत. यासाठी आम्ही दादर (मध्य मुंबई) ते कुलाबा (दक्षिण मुंबई) येथे काम करणाऱ्या डबेवाल्यांच्या सहाय्याने खाण्याचे पदार्थ मोर्चेकऱ्यांपर्यंत थेट आझाद मैदानात पोहोचवण्याचा निर्णय घेतला.’

Kisan Long March: शेतकरी मोर्चाला नेटकऱ्यांचा कलात्मक सलाम

जीपीएस व्हॅनच्या सहाय्याने उपहारगृह, हॉटेल, सार्वजनिक कार्यक्रम आणि घराघरातून खाद्यपदार्थ घेऊन ते गरजूंपर्यंत पोहोचवण्याचं काम ‘रोटी बँक’ या उपक्रमाअंतर्गत करण्यात येतं. त्यामुळे या मोर्चामध्ये अन्नदात्याची भूक भागवण्यासाठी कायपण, हाच पवित्रा मुंबईच्या डबावाल्यांनी घेतला आहे, असं म्हणायला हरकत नाही.