पुण्यातील एमआयटी डिझाइन इन्स्टिटय़ूटमध्ये शिकणाऱ्या नीकिता चोणकर आणि भार्गवी जोगळेकर या दोन विद्यार्थिनींनी मुंबईतील नोकरदारांना त्यांच्या कार्यालयात घरचे जेवण पोहोचविणाऱ्या डबेवाल्यांच्या दिनचर्येचा बारकाईने अभ्यास करून त्यांचे ओझे कमी करण्याबरोबरच त्यांची धावपळ अधिक सुलभ करणारे एक विशिष्ट जॅकेट तयार केले आहे. सुरुवातीला चार डबेवाहकांनी दोन महिने नीकिता आणि भार्गवी या दोघांनी बनविलेले हे जॅकेट प्रत्यक्ष कामात वापरले. त्यानंतर त्यांनी केलेल्या सूचनांनुसार या जॅकेटच्या रचनेत काही बदल करण्यात आले. नीकिता मूळची बदलापूरची. त्यामुळे रोटरी क्लब ऑफ बदलापूर इंडस्ट्रियल एरियाने अशी शंभर जॅकेट्स मुंबईतील डबेवाल्यांना विनामूल्य उपलब्ध करून दिली आहेत.
एमआयटीत उत्पादन रचनाशास्त्रातील पदविका अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या नीकिता आणि भार्गवी यांनी केलेल्या पाहणीत डबेवाल्यांना डोक्यावरील सात किलो वजनी लाकडी पाटीमुळे हालचाल करणे कठीण असल्याचे लक्षात आले. त्यामुळे त्यांनी त्याऐवजी सॅकचे कापड वापरून एक जॅकेट तयार केले. या जॅकेटचे वजन जेमतेम दीड किलो आहे. त्यामुळे त्यांचे ओझे तब्बल साडेपाच किलोने कमी झाले. वजनाप्रमाणे हे जॅकेट लाकडी पाटीच्या तुलनेत स्वस्तही आहे. लाकडी पाटीसाठी त्यांना ९०० रुपये मोजावे लागतात. त्याऐवजी हे जॅकेट त्यांना सहाशे रुपयांत मिळू शकेल.
या जॅकेटमुळे पूर्वीच्या तुलनेत आता ३०-३५ डबे वाहून नेणे अधिक सोपे झाले असल्याची प्रतिकिया राजेश तळेकर यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना व्यक्त केली. ते म्हणाले, डोक्यावरील पाटीमुळे कंबर दुखते. शिवाय उपनगरी रेल्वेतून प्रवास करताना तसेच वाहतुकीतून मार्ग काढताना लाकडी पाटीची अडचण वाटायची. नव्या जॅकेटने तो प्रश्न निकाली निघाला आहे.
जॅकेटची रचना सवरेत्कृष्ट
नीकिताने लहानपणी डबेवाल्यांची दिनचर्या पाहिली होती. नीकिता आणि भार्गवी यांनी त्यांच्या अभ्यासक्रमाचा भाग म्हणून तयार केलेल्या ‘डबेवाल्यांचे जॅकेट’ या रचनेस ‘पुणे डिझाइन फेस्टिव्हल-२०१३’ मध्ये प्रथम पारितोषिक मिळाले. एमआयटी फॅशन इन्स्टिटय़ूटमधील प्राध्यापक धीमंत पांचाल आणि अमित देशमुख यांनी त्यांना मार्गदर्शन केले. या जॅकेटद्वारे एका वेळी ३५ डबे सहजपणे नेता येतात. मुंबईत साधारण पाच हजार डबेवाले असून त्यापैकी शंभरजण हे जॅकेट वापरणार आहेत.