‘मुंबईचे डबेवाले’ हे दोन शब्दच त्यांची ओळख पटवून द्यायला पुरेशी आहे. मुंबईच्या जडणघडणीचे गेल्या शतकभराचे साक्षीदार असलेल्या या डबेवाल्यांचा गौरव म्हणून आता मुंबईत डबेवाल्याचा एक पुतळा उभारण्यात आला आहे. मुंबईत हाजी अली जवळ हा पुतळा उभारण्यात आला आहे.

गेल्या शंभर वर्षांहून जास्त काळ मुंबईतल्या चाकरमान्यांना त्यांच्या घरचं गरमागरम खाणं आणून देणाऱ्या डबेवाल्यांची कीर्ती जगभर पसरली आहे. ‘डबेवाल्यांच्या मॅनेजमेंट’चा अभ्यास हार्वर्डसाऱखी जगविख्यात विद्यापीठंही करतात. इंग्लंडच्या राणीची आई म्हणजेच ‘क्वीनमदर’ हयात असताना त्यांनी राणी एलिझाबेथकडे या डबेवाल्यांबद्द्ल विचारणा केली होती. सुमारे शंभर वर्षांपूर्वी मुंबईचं व्हिक्टोरिया टर्मिनस स्टेशन बांधलं जात असताना तिथल्या भारतीय कामगारांना हे डबेवाले त्यांच्या घरातून ताजं जेवण आणून देत असत. ही गोष्ट कळल्यावर प्रिन्स चार्ल्स यांनी त्यांच्या भारतभेटीदरम्यान मुंबईच्या डबेवाल्यांची भेट घेतली होती.

मुंबईत उभारण्यात आलेला पुतळा १३ फूट उंच असून तो स्टेनलेस स्टीलचा बनवण्यात आला आहे. मुंबईतले शिल्पकार वलय शेंडे यांनी हा पुतळा उभारला असून तो मुंबई महानगपालिकेच्या साहाय्याने उभारण्यात आला आहे. दरदिवशी स्टेनलेस स्टीलचे हजारो डबे वाहून नेणाऱ्या डबेवाल्यांचा पुतळाही स्टेनलेस स्टीलचाच असावा हे त्यांचा संयुक्तिक गौरवचं आहे.

या पुतळ्याकडे पाहिलं तर त्यातल्या अनेक गोष्टी भावतात. या शिल्पातला डबेवाला ताठपणे हातात डबा घेऊन उभा आहे. आॅफिसमधल्या चाकरमान्यांना डबा पोचवण्यासाठी दमदार पावलं टाकत तो चालला आहे. डोक्यावर डबेवाल्यांची पेटंट गांधी टोपी आहे. अंगात सदरा लेंगा आहे. आणि चेहऱ्यावर काबाडकष्ट करणाऱ्याचे भाव आहेत.

या डबेवाल्याच्या चेहऱ्यावरचे भाव खूप काही सांगून जातात.

भल्या सकाळी कष्ट करत मुंबई लोकलच्या भयाण गर्दीत स्वत:ला झोकून देत चाकरमान्यांसाठी गरमागरम खाणं आणणाऱ्या डबेवाल्यांची मुंबईवरची अमीट छाप या शिल्पामुळे अधिकच गहिरी झाली आहे.