राज्याचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांना करोनाचा संसर्ग झाला असून, त्यांना सध्या मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. या पार्श्वभूमीवर त्यांच्या चुलत भगिनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ”दादा,लवकर बरे व्हा” अशी सदिच्छा व्यक्त करत एक भावनिक ट्विट  केलं आहे.

”महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार करोना पॉझिटिव्ह असल्याने,डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ते रुग्णालयात दाखल झाले आहेत. दादा लढवय्ये आहेत. महाराष्ट्रातील जनतेचे आशिर्वाद आणि शुभेच्छा यांच्या बळावर करोना आजाराला पराभूत करुन लवकरच सर्वांच्या सोबत येतील. दादा,लवकर बरे व्हा…” असं सुप्रिया सुळे यांनी ट्विट केलं आहे.

मागील आठवड्यात अजित पवार सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. त्यानंतर त्यांचा प्रदेश कार्यालयात जनता दरबार होणार होता. मात्र, तो रद्द करण्यात आला होता. त्यानंतर अजित पवार यांची प्रकृती बरी नसल्याचं समोर आलं होतं. मात्र, करोना चाचणी निगेटिव्ह आल्याचंही स्पष्ट करण्यात आलं होतं. मात्र, सोमवारी त्यांना डॉक्टरांच्या सल्ल्यानं रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यानंतर त्यांना करोनाचा संसर्ग झाल्याचे उघड झाले.

आणखी वाचा- अजित पवार करोना पॉझिटिव्ह; ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल

“माझी करोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली असून, प्रकृती उत्तम आहे. सावधतेचा उपाय म्हणून डॉक्टरांच्या सल्ल्याने ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल झालो आहे. राज्यातील नागरिक, राष्ट्रवादी काँग्रेसह राज्यातील सर्व राजकीय पक्षांचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांना विनंती आहे की, काळजी करण्याचे काहीही कारण नाही. माझी प्रकृती उत्तम असून, थोड्याशा विश्रांतीनंतर मी लवकरच आपल्यासोबत असेन,” असं अजित पवार यांनी सांगितलं आहे.

अजित पवार यांची आधीही करोना चाचणी करण्यात आली होती. मात्र, त्याचा रिपोर्ट निगेटिव्ह आला होता. मात्र, अजित पवार हे क्वारंटाइन होते. क्वारंटाइनमध्ये असतानाही ते सरकारच्या बैठकांना हजेरी लावण्याबरोबरच कामकाजही पाहत होते. अजित पवारांना करोनाची लागण झाल्याचीही चर्चा होती. मात्र, त्यांचे सुपुत्र पार्थ पवार यांनी ती फेटाळली होती. केवळ खबरदारी म्हणून घरात थांबण्याचा निर्णय त्यांनी घेतल्याचं पार्थ म्हणाले होते.