ज्येष्ठ संगीत समीक्षक व ‘लोकसत्ता’च्या पुणे आवृत्तीचे निवासी संपादक मुकुंद संगोराम यांना दादर-माटुंगा सांस्कृतिक केंद्राचा मानाचा संगीत समीक्षणासाठीचा पुरस्कार जाहीर झाला आहे. नाटय़ व संगीत समीक्षणातील दिग्गज मनोहर वागळे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ हा पुरस्कार नाटक किंवा संगीत समीक्षणासाठी दिला जातो. हा पुरस्कार वितरण समारंभ २६ जानेवारी रोजी संध्याकाळी ५ वाजता होणार आहे.
दादर-माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे दरवर्षी संगीत, नाटक, साहित्य आदी क्षेत्रांमध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येते. यात नाटय़ किंवा संगीत समीक्षणासाठीचा मनोहर वागळे स्मृति पुरस्कार मुकुंद संगोराम यांना जाहीर झाला आहे. ‘रुजुवात’ हे ‘लोकसत्ता’मधील त्यांचे संगीतविषयक सदर गाजले होते. संगोराम यांच्याबरोबरच संपूर्ण जीवन संगीत शिक्षणासाठी अर्पण करणाऱ्या डॉ. मनोहर दाबके आणि पं. यशवंतबुवा महाले यांना ‘संगीत शिक्षक जीवनगौरव पुरस्कार’ देण्यात येणार आहे.
संगीताशिवाय नाटक या क्षेत्रातील दोन कलाकारांनाही विविध पुरस्कार देण्यात येणार आहेत. यात उत्कृष्ट दिग्दर्शनासाठीचा नंदकुमार रावते स्मृती पुरस्कार राजन ताम्हाणे यांना जाहीर झाला आहे. तर ‘आई’च्या भूमिकेसाठी देण्यात येणारा पुरस्कार ‘मायलेकी’ या नाटकासाठी अमिता खोपकर यांना जाहीर झाला आहे.