|| इंद्रायणी नार्वेकर

२९ रस्त्यांवर वाहने उभी केल्यास बडगा; येत्या सोमवारपासून कारवाई :-वाहनांची वर्दळ आणि माणसांच्या गर्दीत हरवून जाणाऱ्या दादर परिसरातील रस्ते यापुढे मोकळे करण्याचा चंग महापालिकेने आणि वाहतूक पोलिसांनी बांधला आहे. त्यासाठी दादरमधील २९ रस्त्यांची निवड करण्यात आली असून या रस्त्यांवर ६१ ठिकाणी उभ्या करण्यात येणाऱ्या वाहनांवर येत्या सोमवारपासून कारवाई करण्यात येणार आहे.

या कारवाईत न. चिं. केळकर मार्ग, सेनाभवन, रानडे रोड, डिसिल्व्हा रोड, स्टार मॉल जंक्शन, कबुतरखाना, दादर स्थानक परिसर, शिवाजी पार्क मैदानाच्या आसपासचे रस्ते आदी महत्त्वपूर्ण रस्ते व ठिकाणांचा समावेश आहे. पार्किंगवरील कारवाईच्या या प्रयोगामुळे दादरचा चेहरामोहरा बदलणार आहे.

मुंबईमधील मध्यवर्ती ठिकाण म्हणून दादर ओळखले जाते. खरेदीसाठी प्रसिद्ध असलेल्या या भागात आजही लोक कपडे, फुले, भाज्या अशा दैनंदिन वस्तूंच्या खरेदीसाठी दादरमध्ये येतात. सणावाराला दादरमध्ये तोबा गर्दी होते. त्यातच वाहनांची ये-जा, दुतर्फा लावलेल्या गाडय़ा यामुळे दादरला रोजच जत्रेचे स्वरूप येते. बहुसंख्य जुन्या इमारतींमुळे या भागात गाडय़ांच्या पार्किंगसाठी जागाच नसल्यामुळे रस्त्यांवरच गाडय़ा उभ्या करण्यात येतात. याचा सर्वाधिक त्रास दादरमधील रहिवाशांना होतो. यावर उपाय म्हणून पालिका आणि वाहतूक पोलीस यांनी दादरमधील सर्वाधिक गर्दीचे रस्ते व ठिकाणे निवडली असून तेथे वाहने उभी करण्यास प्रतिबंध करण्याचा निर्णय घेतला आहे.

दादर स्थानकापासून ते अगदी शिवाजी पार्क, दादर चौपाटीपर्यंतच्या तब्बल २९ रस्त्यांवरील ६१ ठिकाणांचा त्यात समावेश आहे. पालिकेच्या जी-उत्तर विभागाने याबाबत जागोजागी फलकही लावले आहेत. गणेशोत्सवानंतर तेथे प्रत्यक्षात कारवाई करण्यात येणार आहे. राम गणेश गडकरी चौकातील ‘कोहिनूर स्क्वेअर’ इमारतीत पालिकेने सार्वजनिक वाहनतळ उपलब्ध करून दिले आहे. मात्र वाहनधारक आपल्या गाडय़ा रस्त्यावरच उभ्या करीत आहेत. या आठ मजली पार्किंग मनोऱ्यामध्ये १००८ गाडय़ांसाठी जागा आहे. मात्र सध्या तेथील केवळ तीन मजलेच वापरात आहेत. वाहने वाहनतळात उभी करण्याची सवय लोकांना लावण्याची गरज आहे. त्यामुळे वाहतूक पोलिसांच्यामदतीने ही कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

हे रस्ते पार्किंगमुक्त

रानडे रोड, एम. सी. जावळे रोड, डॉ. डिसिल्व्हा मार्ग, न. चिं. केळकर रोड, जे. के. सावंत मार्ग, सेनापती बापट मार्ग, बालगोविंददास मार्ग, पी. ठक्कर मार्ग, टी. एच. कटारिया मार्ग, एस. के. बोले रोड, डॉ. मधुकर राऊत मार्ग, केळुसकर मार्ग, स्वातंत्र्यवीर सावरकर मार्ग, दादासाहेब रेगे मार्ग, अनंत पाटील मार्ग, एल. जे. मार्ग, एस. एच. परळकर मार्ग.

दादरमध्ये रहिवाशांपेक्षाही खरेदीसाठी येणाऱ्याची गर्दी मोठी असते. ही मंडळी आपली वाहने दादर परिसरातील रस्त्यावर उभी करतात. त्यामुळे दादरमध्ये मोठय़ा प्रमाणावर वाहतूक कोंडी होते. गणेशोत्सवामुळे अद्याप कारवाईला सुरुवात केलेली नाही, परंतु येत्या सोमवारपासून कारवाई करण्यात येईल. गाडय़ा उचलून नेऊन कोहिनूर स्क्वेअरमध्ये ठेवल्या जाणार आहेत. तसेच गाडी सोडवून नेण्यासाठी पालिकेच्या नियमानुसार पाच ते दहा हजार रुपयांपर्यंत दंड आकारला जाणार आहे. -किरण दिघावकर, साहाय्यक आयुक्त, जी उत्तर