मध्य रेल्वेच्या पाचव्या-सहाव्या मार्गिकेसाठी स्थानकाची फेररचना; धिम्या, जलद आणि लांब पल्ल्याच्या गाडय़ांसाठी जादा मार्गिका

मध्य रेल्वेवर कुर्ला ते सीएसटी यांदरम्यान पाचव्या-सहाव्या मार्गिकेच्या कामामुळे परळ टर्मिनस अस्तित्वात येणार असतानाच दादर स्थानकाचाही कायापालट होणार आहे. मध्य रेल्वेवरील महत्त्वाच्या स्थानकांमध्ये गणना होत असलेल्या दादर स्थानकात आणखी नवीन तीन फलाट अस्तित्वात येणार आहेत. तसेच या स्थानकाच्या पुनर्रचनेमुळे धिम्या, जलद आणि लांब पल्ल्याच्या गाडय़ांसाठी प्रत्येकी एक एक जादा मार्गिका उपलब्ध होणार आहे. या मार्गिकांमुळे दादर स्थानकातून सुटणाऱ्या किंवा दादपर्यंतच धावणाऱ्या गाडय़ांच्या संख्येत वाढ होणार आहे.

कुर्ला ते सीएसटी यांदरम्यान पाचव्या-सहाव्या मार्गिकेचे काम सुरू झाले आहे. या प्रकल्पाचा भाग म्हणून परळ येथे टर्मिनस होणार आहे. पण त्याचबरोबर दादर स्थानकात या मार्गिकांना जागा करण्यासाठी या स्थानकाची पुनर्रचना होणार आहे. त्यात हे तीन फलाट स्थानकात समाविष्ट होतील. त्यामुळे स्थानकातील फलाटांची संख्या ११ होणार असल्याची माहिती मध्य रेल्वेच्या एका अधिकाऱ्याने दिली.

सध्या दादर स्थानकात लांब पल्ल्याच्या गाडय़ा उभ्या करण्यास फलाट क्रमांक पाच, सहा, सात आणि आठ हे पर्याय आहेत. यापैकी फलाट पाच आणि सहा उपनगरीय मार्गासाठीही वापरले जात असल्याने अनेक लांब पल्ल्याच्या गाडय़ा मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनसपर्यंत आणाव्या लागतात. भविष्यात लांब पल्ल्याच्या गाडय़ांसाठी दोन स्वतंत्र फलाट उपलब्ध झाल्यास गाडय़ा दादपर्यंतच चालवून त्या तेथून थेट देखभाल-दुरुस्तीसाठी नेल्या जाऊ शकतात.

काम कसे होणार?

  • सध्या मध्य आणि पश्चिम दादर स्थानकांच्या मध्ये रेल्वेची मोकळी जागा आहे. पाचव्या-सहाव्या मार्गिका या मोकळ्या जागेच्या बाजूनेच येणार आहेत. त्यामुळे सध्या असलेला फलाट क्रमांक एक आणखी पश्चिमेकडे जाणार आहे.
  • सध्याचा फलाट १ हा भविष्यात फलाट क्रमांक चार म्हणून ओळखला जाईल. तर त्यापुढील फलाटचे क्रमांकही बदलणार आहेत.
  • सध्याच्या फलाट क्रमांक एकच्या बाजूला कल्याणकडे जाणारी धिमी मार्गिका आहे.
  • त्या मार्गिकेच्या पश्चिम दिशेला दोन फलाट बांधले जातील. सध्या येथे रेल्वेची काही कार्यालये आहेत. या दोन फलाटांच्या पलीकडे दोन नव्या मार्गिका असतील.
  • त्या दोन मार्गिकांपलीकडे पश्चिम रेल्वेच्या अगदी जवळ नवीन फलाट क्रमांक एक अस्तित्वात येईल.

प्रवाशांचा फायदा

तीन नवीन फलाटांमुळे दादरहून सुटणाऱ्या उपनगरीय सेवांमध्ये भर पडणार आहे. परळहूनही भविष्यात लोकल सुरू होणार असल्याने दादरवरील गर्दीचा ताण कमी होईल. त्यातच दादरहूनही जादा फेऱ्या सुरू झाल्यास दादर स्थानकात होणारी गर्दी कमी होणार आहे. यात जलद गाडय़ांच्या फेऱ्यांचाही समावेश असल्याने मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनसहून सुटणाऱ्या गाडय़ांमध्ये दादरहून चढणाऱ्या गर्दीचे प्रमाण कमी होईल.

नव्या मार्गिकांचे काय?

पश्चिमेकडील पहिली नवी मार्गिका कल्याणकडे जाणारी धिमी मार्गिका असेल. त्याच्या बाजूची मार्गिका मुंबईकडे जाणारी धिमी मार्गिका म्हणून काम करील. हा फलाट क्रमांक दोन असेल. त्याच्या बाजूलाच असलेल्या फलाट तीनच्या बाजूची मार्गिका म्हणजेच सध्याची कल्याणकडे जाणारी धिमी मार्गिका ‘लूप लाइन’ म्हणून काम करील. या मार्गिकेवरून दादर लोकल सोडणे शक्य होईल. सध्या फलाट दोनच्या बाजूची मार्गिका डाऊन जलद मार्गिका असेल. सध्याच्या फलाट तीनवर मुंबईकडे जाणाऱ्या जलद गाडय़ा येतील. सध्याच्या फलाट चारवरून जलद दादर लोकल सोडण्यात येतील. सध्या पाच आणि सहा क्रमांकाचे फलाट भविष्यात फलाट क्रमांक आठ आणि नऊ म्हणून ओळखले जातील. हे फलाट पूर्णपणे लांब पल्ल्याच्या गाडय़ांसाठी असतील.