मॅजेस्टिक प्रकाशनातर्फे देण्यात येणाऱ्या यंदाच्या ‘केशवराव कोठावळे पारितोषिका’साठी जया दडकर लिखित ‘दादासाहेब फाळके-काळ आणि कर्तृत्व’ या चरित्र ग्रंथाची निवड करण्यात आली आहे. २५ हजार रुपये आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. ललित मासिकाचा सुवर्ण महोत्सव आणि पारितोषिकाचे ३० वे वर्ष याचे औचित्य साधून यंदा हे पारितोषिक विशेष पुरस्कार या स्वरूपात दिले जाणार आहे.
डॉ. मीना वैशंपायन, प्रा. प्रतिभा कणेकर, चंद्रकांत भोंजाळ यांच्या निवड समितीने या पुस्तकाची निवड केली आहे. विपुल चरित्रसामग्रीचे संकलन, अस्सल चरित्रसाधनांचा शोध आणि यातून चरित्रनायकाचे माणूस म्हणून केलेले आकलन व त्यांच्या कर्तृत्वाचे केलेले मूल्यमापन ही या चरित्र ग्रंथाची वैशिष्टय़े असल्याचे निवड समितीने म्हटले आहे. केशवराव कोठावळे यांच्या स्मृतिदिनी, ५ मे रोजी दादर (पश्चिम) येथे धुरू सभागृहात सायंकाळी ६.३० वाजता होणाऱ्या कार्यक्रमात ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण केले जाणार असल्याचे केशवराव कोठावळे पारितोषिक निवड समितीचे निमंत्रक अशोक कोठावळे यांनी सांगितले.