News Flash

१५ गोविंदा अजूनही रुग्णालयात

रत्नागिरीतील कासे गावामध्ये आयोजित केलेल्या दहीहंडीत १७ वर्षांची सोनल सुर्वे ही गंभीर जखमी झाली आहे.

उत्सवातील अतिउत्साह अंगलट; सुरक्षेची खबरदारी न घेतल्याचा फटका

वर्षांतून एकदाच येणाऱ्या दहीहंडी उत्सवासाठी साधारण महिनाभर आधी सराव करून ‘मैदानात’ उतरणाऱ्या काही गोविंदांचा अतिउत्साह आणि सुरक्षेबाबत न घेतलेली खबरदारी त्यांच्या अंगलट आली. मंगळवारी रात्री उशिरापर्यंत मुंबईत २०२ गोविंदा जखमी झाल्याची नोंद झाली. त्यापैकी १५ जण अद्याप रुग्णालयात उपचार घेत असून यातील काही जणांच्या डोक्याला दुखापत झाल्याने त्यांची प्रकृती गंभीर आहे.

गोवंडी भागात राहणारे शशिकांत कांबळे (४१) दहीहंडी फोडण्यासाठी सकाळीच घराबाहेर पडले. दहीहंडी फोडण्याचा आनंद होताच आणि गेला महिनाभर केलेल्या सरावाची परीक्षा होती. मात्र दहीहंडीच्या पहिल्या थरावर पाय सरकल्याने खाली पडून त्यांच्या डोक्याला जबर मार बसला. मंगळवारी दुपारपासून त्यांच्यावर शीव रुग्णालयात उपचार सुरू आहेत. डोक्याबरोबर त्यांच्या डाव्या डोळ्यालाही मार लागला आहे. बुधवारी सकाळपासून त्यांची आई त्यांच्या उशाशी बसून आहे. डोक्यावर पडल्यामुळे त्यांची सीटीस्कॅन तपासणी करण्यात आली आहे.

रत्नागिरीतील कासे गावामध्ये आयोजित केलेल्या दहीहंडीत १७ वर्षांची सोनल सुर्वे ही गंभीर जखमी झाली आहे. दरवर्षी कासे गावातील वाडय़ांमध्ये दहीहंडीचा उत्सव साजरा केला जातो. वाडीमध्ये दहीहंडी फोडण्यासाठी या भागातील मुली अग्रस्थानी असतात. दहीहंडी फोडण्यासाठी सोनल पहिल्या थरावर चढली होती. त्याचवेळी पाय सरकला आणि खाली दगडावर ती आदळली. डोक्याला जबरदस्त मार लागल्याने तिच्या डोक्यातून खूप रक्तस्राव झाला. तातडीने तिला रत्नागिरीत सरकारी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर तिला शीव रुग्णालयात दाखल करण्यात आले.

मंगळवारी रात्रीपर्यंत २०२ गोविंदा जखमी झाले. त्यापैकी १८७ गोविंदांवर उपचार करून सोडण्यात आले, तर १५ गोविंदा अजूनही रुग्णालयात उपचार घेत आहेत. सध्या रुग्णालयात दाखल झालेल्या गोविंदांमध्ये डोक्याला मार लागणे, हाताला व पायाला फ्रॅक्चर होणे आदींची संख्या अधिक आहे. चिराग पांचाळ (२४) व वीरेंद्र विश्वकर्मा (१९) हे गोविंदा दहीहंडीच्या काळात दुचाकीवरून अपघात झाल्याने रुग्णालयात दाखल झाले आहेत.

भरधाव वेगाने गाडी चालवीत असल्याने अपघात झाल्याचे या गोविंदांच्या मंडळातील कार्यकर्त्यांनी सांगितले. वीरेंद्रच्या पायाला फ्रॅक्चर झाले असून चेहऱ्यावर जखमा आहेत. जखमी झालेल्या अनेक गोविंदांचा विमा काढलेला नसल्याने उपचाराचा सर्व खर्च गोविंदांना आपल्या खिशातून करावा लागत आहे. सुरक्षिततेची काळजी घेतली नसल्याने उत्साहाचे वातावरण आणणारी दहीहंडी अनेकांच्या घरी निराशा घेऊन येत असल्याचे दिसत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 17, 2017 2:40 am

Web Title: dahi handi 2017 govinda accident
Next Stories
1 वीजचोर टोळीला ‘मोक्का’
2 यंदा ‘मुंबईचा राजा’चा मान कोणाचा?
3 माहीममधील इमारत ‘सिद्धीसाई’च्या वाटेवर?
Just Now!
X