पाच वर्षाच्या मुलाला उंचीवर चढवणे यात कोणतं साहस आहे? साहसी क्रीडा प्रकार म्हणजे काय? असे सवाल मुंबई हायकोर्टाने राज्य सरकारला विचारले आहेत. २०१५ मधील निर्णयासंदर्भात सरकारने भूमिका स्पष्ट करावी असे हायकोर्टाने म्हटले आहे.

दहीहंडीला साहसी क्रीडा प्रकार म्हणून घोषित करा अशी मागणी राज्य सरकारने केली आहे. तर सामाजिक कार्यकर्त्या स्वाती पाटील यांनी दहीहंडीत लहान मुलांच्या समावेशाला विरोध दर्शवला असून त्यांनी हायकोर्टात याचिकाही दाखल केली आहे. या याचिकेवर सोमवारी सुनावणी झाली. मुंबई हायकोर्टाचे न्यायमूर्ती आर एम सावंत आणि न्यायमूर्ती साधना जाधव यांच्या खंडपीठाने सरकारवर प्रश्नांची सरबत्ती केली. साहसी खेळ म्हणजे काय, साहसी खेळाचा नेमका अर्थ काय, पाच वर्षांचा मुलगा २० फुटापेक्षा जास्त उंचीवर चढू शकतो का असा सवाल हायकोर्टाने सरकारला विचारला. या प्रकरणात राज्य सरकारला भूमिका मांडण्यासाठी ४ ऑगस्टपर्यंतचा अवधी देण्यात आला आहे. हायकोर्टाने सरकारला नोटीस बजावली आहे.

दहीहंडीप्रकरणी गेल्या आठवड्यात झालेल्या सुनावणीत हायकोर्टासमोर भाजपच्या मुंबई युवा गटाचे अध्यक्ष गणेश पांडे यांनी बिनशर्त माफी मागितली होती. २०१५ मध्ये पांडे यांनी वांद्रे येथे दहीहंडीचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला भाजपचे मुंबई अध्यक्ष आशीष शेलार हेही प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या कार्यक्रमात न्यायालयाचे आदेश धाब्यावर बसवत गोविंदा पथकांनी २० फुटांपेक्षा जास्त थर लावले होते.