21 April 2019

News Flash

राम कदम यांच्या दहीहंडी उत्सवावर समन्वय समितीचा बहिष्कार

दहीहंडी उत्सवात राम कदम यांनी केलेल्या बेताल वक्तव्यानंतर समन्वय समितीचा निर्णय जाहीर

दहीहंडी उत्सवात बेताल वक्तव्य करणारे भाजपाचे आमदार राम कदम यांच्या दहीहंडी उत्सवावर दहीहंडी उत्सव समन्वय समितीने बहिष्कार घातला आहे. दहीहंडी समन्वय समितीचे अध्यक्ष बाळा पडलेकर यांनी या संदर्भातली घोषणा केली. असे राम कदम यापुढे तयार होऊ नयेत म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याचे पडलेकर यांनी जाहीर केले. पुढील वर्षी राम कदम यांनी दहीहंडी उत्सव साजरा करू नये. केला तर त्यांच्या उत्सवात दहीहंडी समन्वय समितीचे एकही गोविंदा पथक जाणार नाही असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

अभिनेत्री प्राची देसाई सिनेमातला डायलॉग म्हणून दाखवत होती एवढ्या कारणासाठीच गोविंदांना सातव्या थरावरून राम कदम यांनी खाली उतरवलं. एवढंच नाही तर मुलींबाबत अपमानास्पद वक्तव्य केल्याने राम कदम यांच्यावर चौफेर टीका होताना दिसते आहे. अशात आता गोविंदांनीही राम कदम यांच्या दहीहंडी उत्सवात थर लावण्यास नकार दिला आहे. पुढच्या वर्षी समन्वय समितीचा एकही सदस्य राम कदम यांच्या दहीहंडी उत्सवात जाणार नाही असंही समितीने जाहीर केले आहे.

राम कदम यांच्या बेताल वक्तव्यामुळे त्यांच्यावर चौफेर टीका सुरूच आहे. अशात आता पुन्हा एकदा त्यांच्य अडचणी वाढल्या आहेत असेच म्हणता येईल कारण आता समन्वय समितीनेही त्यांच्या दहीहंडी उत्सवावर बहिष्कार घातला आहे. एक काळ असा होता की राम कदम यांचा दहीहंडी उत्सव हा त्यांच्या प्रतिष्ठेचा विषय होता. मात्र त्यांनी केलेल्या बेताल वक्तव्यामुळे आणि सातव्या थरांवरून गोविंदांना खाली उतरवल्यामुळे हा उत्सवच साजरा न करण्याची नामुष्की त्यांच्यावर ओढवली आहे. एवढेच नाही तर त्यांनी उत्सव साजरा केलाच तर दहीहंडी समन्वय समितीने त्यांच्यावर बहिष्कार घातला आहे त्यामुळे त्याकडे गोविंदा पाठच फिरवतील हे नक्की.

First Published on September 6, 2018 11:54 pm

Web Title: dahi handi comittee ban on mla ram kadams dahi handi utsav