31 March 2020

News Flash

दहीहंडी उत्सवातून बडय़ा आयोजकांची माघार

तयारी वाया गेल्याने ‘गोविंदां’मध्ये नाराजी

तयारी वाया गेल्याने ‘गोविंदां’मध्ये नाराजी

दहीहंडी आयोजित करणाऱ्या बऱ्याच बडय़ा आयोजकांनी तसेच काही नामांकित पथकांनी माघार घेतल्याने यंदाच्या दहीहंडी उत्सवावर निरुत्साहाचे सावट आहे. उत्सवासाठी केलेली तयारी वाया गेल्याने अनेक गोविंदांमध्ये नाराजीची भावना आहे.

कोल्हापूर-सांगली पूरग्रस्तांबाबत असलेली कर्तव्यभावना जपण्यासाठी यंदाच्या उत्सवातून माघारीचा निर्णय घेतल्याचे आयोजकांचे म्हणणे आहे. मोठय़ा गोविंदा आयोजकांच्या माघारीमुळे उत्सव शांततेत पार पडेल आणि वाहतूक कोंडीही होणार नाही, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

मुंबईतील बरेच मोठे आयोजक दरवर्षी दहीहंडी उत्सवात उंचच उंच व्यासपीठ उभारून तेथे कलाकारांना बोलावतात. रोख पारितोषिके ठेवून विक्रमी थर लावण्यासाठी गोविंदा पथकांना प्रोत्साहन देतात. यामुळे जमलेली गर्दी बेशिस्तीचा कळस गाठते. वाहतूक कोंडीसारख्या समस्या उद्भवतात. मात्र या वर्षी नामांकित गोविंदा पथके आणि आयोजक यांनी माघार घेतल्याने उत्सव शांततेत पार पडेल, पैशाची उधळपट्टी कमी होईल आणि पारंपरिकतेवर भर दिला जाईल. या सगळ्या परिस्थितीमुळे महिनोन् महिने तालमी करणारे गोविंदा मात्र नाराज झाले आहेत. निवडणुका जवळ आल्याने या वर्षी जास्त हंडय़ा लागतील, अशी पथकांना अपेक्षा होती. मात्र ती फोल ठरली आहे.

वरळीच्या जांबोरी मैदान येथे शिवसेना आमदार सुनील शिंदे यांची दहीहंडी दरवर्षी लागते. मात्र या वर्षी जास्त गाजावाजा न करता अगदी साधेपणाने दहीहंडी साजरी करण्याचा निर्णय शिंदे यांनी घेतला आहे. या वेळी पारंपरिक पद्धतीने पूजन होईल आणि त्यानंतर दोन हंडय़ा फोडल्या जातील. दरवर्षी साडेतीन ते चार लाख रुपये खर्च या उत्सवावर होतो. तो टाळून अडखूर या पूरग्रस्त गावातील नागरिकांना निवारा उभा करण्यासाठी आर्थिक मदत केली जाणार आहे.

बोरिवली पूर्वेला देवीपाडा येथे शिवसेना आमदार प्रकाश सुर्वे यांच्या वतीने आयोजित केली जाणारी दहीहंडीसुद्धा रद्द झाली आहे. यामुळे दरवर्षी खर्च होणारे १० ते १५ लाख यंदा वाचतील. ही रक्कम शिवसाहाय्य निधीत जमा करून पूरग्रस्तांपर्यंत पोहोचवली जाईल, असे प्रकाश सुर्वे यांनी सांगितले.

गिरगावातील मानाची दहीहंडी शिवसेना विभाग प्रमुख पांडुरंग सक पाळ आयोजित करतात. यासाठी बक्षिसाची रक्कम ३ लाख ३३ हजार असते. दहीहंडी उत्सवाचे हे दहावे वर्ष होते. मात्र उत्सवावरचा खर्च टाळून १ लाख ११ हजारांचा धनादेश उद्धव ठाकरे यांच्याकडे सोपवणार असल्याचे सकपाळ यांनी सांगितले. काँग्रेसचे माजी मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांनीही आपली अंधेरी येथील दहीहंडी रद्द करत कोल्हापूर जिल्ह्य़ातील काही पूरग्रस्त शाळांना आवश्यक साहित्य पोहोचवणार असल्याचे सांगितले आहे.

‘‘जे लोक दहीहंडीमुळे मोठे झाले तेच आता हंडय़ा रद्द क रत आहेत याची खंत वाटते. अनेक महिन्यांची मेहनत वाया गेल्यामुळे गोविंदांची मने दुखावली गेली आहेत. पूरग्रस्तांना अनेक पथकांनी मदत केली आहे. आयोजकांनी उत्सव रद्द करण्यापेक्षा साधेपणाने, कमी रकमेची बक्षिसे देऊन साजरा करावा. आज दहीहंडी रद्द होत असली तरी काही दिवसांनी गणेशोत्सवावर खर्च होणारच आहे ना?’’     – उपेंद्र लिंबाचिया, दहीहंडी उत्सव समन्वय समिती

पारंपरिक पद्धतीने सण साजरा करण्यासाठी फार मोठा खर्च येत नाही. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे या वर्षीसुद्धा आमचा उत्सव साधेपणाने साजरा होईल. सांगलीतील नगर वाचनालयाला आम्ही जुनी पुस्तके  देणार आहोत. लोकांनीही त्यांच्याकडील जुनी पुस्तके  वाचनालयाला द्यावीत असे आवाहन दहीहंडीदरम्यान करणार आहोत        – मंदार नेरुरकर, अध्यक्ष, आयडियल दहीहंडी उत्सव

शाळा-महाविद्यालयांना आज सुट्टी

मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे शहरात दहीहंडीनिमित्ताने शाळांना आणि महाविद्यालयांना शनिवारी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. दरवर्षी जिल्हाधिकारी दहीहंडीची सुट्टी जाहीर करत असतात. या वर्षी शनिवारी शासकीय सुट्टी असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी सुट्टी जाहीर केली नव्हती. मात्र त्याबाबत शाळा-महाविद्यालयांमध्ये गोंधळ होता. म्हणून शुक्रवारी शालेय शिक्षण विभागाने परिपत्रक काढत शाळा आणि उच्च माध्यमिक विद्यालये यांना सुट्टी जाहीर केली आहे. शालेय शिक्षणमंत्री अ‍ॅड. आशीष शेलार यांनी ट्वीट करून ही माहिती दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 24, 2019 2:04 am

Web Title: dahi handi festival 2019 krishna janmashtami 2019 mpg 94
Next Stories
1 वाहनांच्या गर्दीचा अंदाज घेऊन सिग्नलचे नियमन
2 गोविंदांसमोर अर्थसंकट
3 बेस्ट संपाबाबत निर्णय आज
Just Now!
X