थर आणि बालगोविंदांच्या समावेशाबाबत संभ्रम असल्याने सरावातही अल्प प्रतिसाद

थरांवरील मर्यादा आणि बालगोविदांचा समावेश यावरून कायद्याच्या कचाटय़ात सापडलेल्या दहीहंडी उत्सवावर यंदा संभ्रमाचे सावट असून त्याचा परिणाम अनेक गोविंदा मंडळांच्या सरावावरही झाला आहे.

दहीहंडी उत्सव अवघ्या १०-२५ दिवसांवर येऊन ठेपला आहे. दरवर्षी गुरुपौर्णिमेच्या मुहूर्तानंतर संपूर्ण मुंबापुरीत गल्लोगल्ली सराव करताना अनेक गोविंदा पथक पाहायला मिळत. अनेक गोविंदा आपली कामे आटपून दहीहंडीच्या सरावासाठी रात्री बाहेर पडत. परंतु सध्या या गोविंदा पथकांचे लक्ष सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे लागलेले आहेत. त्यामुळे सरावाने अद्याप जोर पकडलेला नाही. हंडी नेमकी किती थराची असेल, वयोमर्यादा काय असेल, हंडीची उंची किती असेल, अशा अनेक प्रश्नांनी या गोविंदांना भेडसावल्याने सरावाला जावे की नाही, असा विचार अनेक गोविंदा करत आहेत.

दहीहंडी उत्सव सुरू होण्याच्या आधीच याबाबतचा निकाल का दिला गेला नाही? आतापर्यंत निर्णय झाला असता तर आम्ही त्यानुसार नियोजन केले असते. परंतु सर्वच अनिश्चित असल्याने तरुण मंडळी सरावातही फारसा रस घेत नाहीत, असे एका मंडळाच्या कार्यकर्त्यांने सांगितले.

उत्साह नाही

दहीहंडीबाबत मंडळांमध्ये संभ्रम आहे. दरवर्षी पथकांमध्ये उत्साह असतो, तो यावर्षी दिसत नाही आहे. मुले पाच मिनिटेही हंडीच्या सरावाला बाहेर पडत नाही. सध्या पथकातील ३०० सभासदांपैकी फक्त ५० जणच सरावासाठी येत आहेत.

– पद्माकर कुवेसकर, खापरादेवी मंडळ, करी रोड.

 

तुरळक उपस्थिती

थर किती लावावेत याबाबत संभ्रम असल्याने फार तुरळक संख्येने मुले सरावासाठी येत आहेत.

– संदेश महाडिक, जय भारत सेवा संघ, लोअर परळ.

 

संस्कृतीसाठी साजरीकरण

आम्ही स्पर्धेसाठी नव्हे तर, संस्कृती जपण्यासाठी दहीहंडी उत्सव साजरा करतो. मात्र आयोजकांच्या मोठमोठय़ा हंडय़ांमुळे यात स्पर्धा आली आहे. हा वाद न्यायालयात गेल्याने आमच्यासारख्या संस्कृती जपणाऱ्या अनेक पथकांना याचा फटका बसत आहे.

– मनीष भावे, सरस्वती गोविंदा पथक, करी रोड.

 

गोविंदा नाहक अडकला

अपघातांची भीती दाखवत दहीहंडीमध्ये जाणीवपूर्वक वातावरण निर्माण करण्यात आले आहे. याचा मोठा परिणाम गोविंदांच्या सरावावर झाला आहे. दुसऱ्या बाजूला संस्कृती जपण्यापेक्षा आयोजकांमध्येच चढाओढ लागलेली दिसते. यात आमचा गोविंदा मात्र नाहक अडकला.

– विवेक तागडे, अखिल मालपा डोंगरी मंडळ १,२,३, अंधेरी (पू.).

 

गंमत गेली

अपघातांची गेल्या दोन वर्षांपासून सुरू असलेल्या या गोंधळामुळे आता दहीहंडी उत्सवामध्ये सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे. पूर्वीची या सणातील गंमतच निघून गेली आहे.

– तेजश्री परब, विलेपार्ले.