दहिसर येथील मांसाहार वादात आता राजकीय पक्षांनी उडी घेतली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार जीतेंद्र आव्हाड हे शनिवारी येथे चव्हाण यांच्या भेटीसाठी गेले होते. तर कॉंग्रेसचे आमदार नितेश राणे यांनीही चव्हाण कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांच्या पाठीशी असल्याचे जाहीर केले आहे.
‘बोना व्हेंचर’ या सहकारी गृहनिर्माण संस्थेत राहणारे गोविंद चव्हाण यांच्या घरी मांसाहार केला जातो म्हणून इमारतीमधील अमराठी रहिवाशांनी चव्हाण यांची पत्नी व मुलगी यांना मारहाण केली असल्याचा आरोप चव्हाण यांच्याकडून करण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणी शुक्रवारी सहा जणांना ताब्यात घेतले होते. त्यांना शनिवारी १० हजार रुपयांच्या वैयक्तिक जामीनावर सोडण्यात आले.
या वादात आता राजकीय पक्ष व नेते उतरल्याने या वादाला आता वेगळे वळण लागले आहे. शुक्रवारी रात्री शिवसेना आणि मनसेच्या कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्याबाहेर गर्दी करत आंदोलनाचा प्रयत्न केला. तर शनिावारी सकाळी आव्हाड हे दहिसर येथे चव्हाण यांची भेट घेण्यासाठी येणार असल्याचे समजताच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी इमारतीच्या परिसरात गर्दी केली. यावेळी झोन ११ चे उपायुक्त विक्रम देशमाने घटनास्थळी पोहोचले व त्यांनी चव्हाण तसेच त्याठिकाणी आलेले आव्हाड यांना ताब्यात घेतले व काही वेळाने सुटकाही केली. कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी ही कारवाई केल्याचे देशमाने यांनी स्पष्ट केले. दरम्यान, मुंबईत मांसाहार करणाऱ्यांना जर घर नाकारले जात असेल तर त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा किंवा विकासकाला काळ्या यादीत टाकावे, अशी मागणी राणे यांनी केली आहे.