दहिसर पूर्वेला रेल्वे स्थानकाला लागून असलेल्या स्काय वॉकची दोन वर्षांतच देखभालीअभावी दुर्दशा झाली आहे. येथील स्काय वॉकच्या लाद्या अनेक ठिकाणी उखडल्या आहेत. परंतु, गेले सहा महिने त्यांची दुरूस्तीच करण्यात आलेली नाही. त्यामुळे, आजुबाजूच्या लाद्याही उखडत आहेत. परिणामी दुरूस्तीचे काम वाढत चालले आहे.

रेल्वे स्थानकाबाहेर प्रवाशांना चालणे सोयीचे जावे यासाठी स्कॉय वॉकची संकल्पना एमएमआरडीएने मुंबईत राबविली. मुंबईत सर्वप्रथम जून, २००८मध्ये वांद्रे पूर्वेला स्काय वॉक बांधण्यात आला. साधारणपणे एक लाखांच्या आसपास पादचारी या स्काय वॉकचा वापर करतात. या स्काय वॉकला मिळालेल्या यशानंतर मुंबईत सुमारे ६०० रुपये खर्चून आणखी ३७ ठिकाणी स्काय वॉक बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यापैकी एक म्हणजे दहिसरचा पूर्वेला रेल्वे स्थानकाला लागून असलेला स्काय वॉक.

फेब्रुवारी, २०१०ला हा स्काय वॉक पादचाऱ्यांकरिता खुला करण्यात आला. ४१० मीटर लांबीच्या या स्काय वॉकचा पादचारी बऱ्यापैकी वापर करतात. एस. व्ही. मार्गावर दहिसर रेल्वे स्थानक ते संमेलन हॉटेलपर्यंत हा स्काय वॉक जातो. परंतु, १४.४५ कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या या स्काय वॉकची देखभाल रामभरोसे असल्याचे दिसून येते. स्काय वॉकच्या लाद्या उखडून सहा महिने झाले. परंतु, त्यांची अध्याप दुरूस्ती झालेली नाही. सुरवातीला थोडय़ाच लाद्या उखडल्या होत्या. परंतु, वेळीच दुरूस्ती न झाल्याने आता बऱ्याच लाद्या उखडल्या आहेत. परिणामी दुरूस्तीचे कामही वाढले आहे. या लाद्या वेळीच बसविण्यात आल्या नाहीत तर हे काम आणखी वाढेल. त्यामुळे, संबंधितांनी याची लवकरात लवकर दुरूस्ती करावी, अशी प्रतिक्रिया या स्काय वॉकचा वापर करणारे दहिसरचे रहिवाशी राजेश पंडय़ा यांनी व्यक्त केली.