महापालिकेच्या राजावाडी रुग्णालयात गेल्या १३ वर्षांत सुमारे ७६ हजार रुग्णांचा झालेला मृत्यू चक्रावून टाकणारा आहे. माहिती अधिकारातून उघड झालेल्या या आकडेवारीने गोंधळ उडाल्याने पालिका प्रशासनाने सावधगिरीचा पवित्रा घेत आकडेवारीबाबत साशंकता व्यक्त केली.
महापालिकेच्या केईएम, नायर व सायन या रुग्णालयात अत्यवस्थ स्थितीत येणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त असते. मात्र या प्रमुख रुग्णालयाएवढा मोठा आवाका नसलेल्या आणित्या तुलनेत दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्याही कमी असलेल्या राजावाडी रुग्णालयात मृत्यूंची संख्या मात्र भुवया उंचावणारी ठरली आहे. शुक्रवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत राजावाडी रुग्णालयातील अव्यस्थेबाबत चर्चा झाली तेव्हा काँग्रेसचे नगरसेवक प्रवीण छेडा यांनी राजावाडी, लोकमान्य टिळक व नायर रुग्णालयातील गेल्या १३ वर्षांमधील मृतांची आकडेवारी सादर केली. माहिती अधिकारातून रुग्णालयाच्या अधिष्ठातांकडून मिळालेल्या माहितीनुसार राजावाडी रुग्णालयात एप्रिल २००१ ते मार्च २०१४ या १३ वर्षांत ५५ लाख ७५ हजार ७१६ रुग्ण दाखल झाले होते. त्यापैकी ७६,६६३ रुग्णांचा मृत्यू झाला. याचाच अर्थ दर दिवशी १६ जण
मृत्यू पावले.
लोकमान्य टिळक रुग्णालयात याच १३ वर्षांत सुमारे एक कोटी ९२ लाख रुग्ण दाखल झाले व त्यापैकी ६३,३७३ रुग्णांचा मृत्यू झाला. तर नायर रुग्णालयात याच काळात सुमारे ३३ लाख रुग्ण उपचारांसाठी दाखल झाले. या काळात मृत्यूचा आकडा २९,६५० होता. लोकमान्य टिळक व नायर या रुग्णालयात दरदिवशी अनुक्रमे १३  व  सहा जणांचा मृत्यू झाला. केईएम व नायर येथे रुग्णांचे प्रमाण अधिक आहे. त्या तुलनेत राजावाडी रुग्णालयातील मृत्यूचे प्रमाण खूपच जास्त असल्याने या रुग्णालयाच्या एकूणच कामकाजाबाबत प्रवीण छेडा यांनी शंका उपस्थित केली.

माहिती अधिकारांअंतर्गत देण्यात आलेल्या या माहितीची सत्यासत्यता पुन्हा तपासावी लागेल. गेल्या वर्षभरात राजावाडी येथे १००८ मृत्यू झाले. म्हणजे दिवसाला साधारण तीन मृत्यू झाले. आधीच्या वर्षांमध्ये मृत्यूच्या प्रमाणात एवढी तफावत असण्याची शक्यता कमी आहे. वर्षांला दरहजारी सात मृत्यू हे प्रमाण सामान्य मानले जाते. मुंबईच्या दक्षिण भागात सातहून कमी तर उपनगरात ५.६ प्रमाण आहे
संजय देशमुख, अतिरिक्त आयुक्त