साधरणपणे अवघे ३०० रुपये दिवसाकाठी कमाई असलेल्या कल्याणमधील एक मजुरास प्राप्तिकर विभागाच्या कार्यालयाकडून तब्बल १ कोटी ५ लाख ८२ हजार ५६४ रुपयांचा कर भरणा करण्याची नोटीस मिळाली आहे. भाऊसाहेब अहिरे असं या व्यक्तीचं नाव असून तो आपल्या कुटुंबासह एक झोपडीत राहतो. ही नोटीस त्याला त्याच्या बँक खात्यात जमा असलेल्या पैशांच्या आधारावर पाठवण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे, याप्रकरणी आहिरे यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

नोटीबंदी दरम्यान खात्यात जमा झाले ५८ लाख
प्राप्तिकर विभागाच्या म्हणण्यानुसार नोव्हेंबर २०१६ मध्ये नोटाबंदीच्या कालावधीत अहिरे यांच्या खात्यात ५८ लाख रुपये जमा करण्यात आले होते. अहिरे हे मुळचे उस्मानाबाद जिल्ह्यातील असून ते अंबिवलीतील गेलगावमधील एका झोपडपट्टीत पत्नी व दोन मुलींसह सहा वर्षांपासून राहत आहेत.

मतदान कार्ड आणि पॅनकार्डच्या सहाय्याने उघडे खाते
अहिरे यांनी यासंदर्भात सांगितले आहे की, मागील वर्षी ५ सप्टेंबर रोजी एका खासगी बँक खात्यात ५८ लाख रुपये जमा केल्यासंदर्भात आयटी विभागाकडून नोटीस मिळाली होती.  मी आयटी विभागाच्या अधिकाऱ्यांशी यासंदर्भात संपर्क साधला होता. त्यांनी मला बँकेकडे पाठवले. बँकेत आल्यावर माहिती मिळाली की, माझ्या पॅनकार्ड आणि मतदान कार्डाचा वापर करून एक बनावट खातं उघडण्यात आलं आणि त्यात पैसे जमा करण्यात आले होते.

अहिरेंकडून हा देखील दावा करण्यात आला आहे की, फसवेगिरी करणाऱ्यांनी खातं उघडण्यासाठी त्यांची बनावट स्वाक्षरी देखील केली. शिवाय पॅनकार्डची जी प्रत जोडण्यात आली आहे, त्यावर फोटो देखील दुसराच आहे. याप्रकरणी पुन्हा एकदा ७ डिसेंबर रोजी आयटी विभागाकडून नोटीस आली, ज्यामध्ये सांगण्यात आले की २०१७-१८ या वर्षातील उत्पनाबद्दल १.०५ कोटींचा कर भरावा लागणार आहे. शिवाय ही कराची रक्कम न भरल्यास विभागाकडून ३० दिवसांत वसुलीचे काम सुरू केले जाईल.

या प्रकरामुळे हतबल झालेल्या अहिरेंनी सांगितले की, मी आयुष्यात कधी एक लाख रुपये पाहिले नाही, मी १.०५ कोटींचा कर भरणा कसा करू शकतो? ही फसवेगिरी आहे. त्यांनी याप्रकरणी ठाणे ग्रामीण पोलीस अधिक्षक शिवाजी राठोड यांच्याशी संपर्क साधला व फसवेगिरी करणाऱ्याविरुद्ध कारवाईची मागणी केली आहे. अहिरेंच्या तक्रारीवरून राठोड यांनी टिटवाळा पोलिसांना याप्रकरणी तपासाचे आदेश दिले आहेत. लवकरच दोषींविरोधात कारवाई सुरू होईल, असं राठोड यांनी सांगितलं आहे.