रुग्णालयांना होणाऱ्या पुरवठय़ाचा दैनंदिन आढावा; आधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेणार

मुंबई : मुंबईतील रुग्णालयांना प्राणवायूची कमतरता भासू नये, रुग्णांच्या जिवाला धोका निर्माण होऊ नये म्हणून पालिका प्रशासनाने प्राणवायू साठय़ावर देखरेख ठेवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे. प्राणवायू पुरवठय़ावर देखरेख ठेवण्यासाठी पालिके ची पथके नेमण्यात आली असून ही पथके रुग्णालयांना दररोज प्राप्त झालेल्या प्राणवायूच्या साठय़ाची माहिती ‘गूगल ड्राइव्ह’मध्ये अद्ययावत करणार आहेत. त्यामुळे मुंबईतील रुग्णालयांमध्ये दररोज किती प्राणवायू उपलब्ध होतो, त्यावर देखरेख ठेवता येणार आहे. तसेच एखाद्या रुग्णालयातील प्राणवायू संपत आल्यास त्याचीही माहिती तात्काळ मिळू शकेल.

करोना रुग्णांची संख्या वाढू लागल्यानंतर राज्यात सर्वत्र प्राणवायूचा तुटवडा निर्माण झाला आहे.  दोन दिवसांपूर्वीच पालिका रुग्णालयातील प्राणवायूच्या तुडवडय़ाच्या शक्यतेमुळे १६८ रुग्णांना अन्य रुग्णालयात स्थलांतरित करावे लागले होते. प्राणवायूचा पुरवठा सुरळीत राखण्यासाठी पालिके ने सहा समन्वय अधिकाऱ्यांची नियुक्ती के ली होती. आता प्राणवायू साठय़ाबाबतची माहिती अद्ययावत करण्यासाठी व दैनंदिन प्राणवायू वितरण प्रणालीमध्ये अचूकता आणण्यासाठी पालिके ने आधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेण्याची तयारी सुरू के ली आहे.  या पार्श्वभूमीवर, प्राणवायू पुरवठय़ासंदर्भात प्रणालीमध्ये अधिक सुसूत्रता व समन्वय साधण्यासाठी पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी सोमवारी दूरदृश्य प्रणालीद्वारे आढावा बैठक घेतली. या बैठकीत पालिके चे सर्व वरिष्ठ अधिकारी व अन्न व औषध प्रशासन आयुक्त अभिमन्यू काळे यांच्यासह महानगरपालिकेचे विविध सहआयुक्त, उपआयुक्त, सर्व साहाय्यक आयुक्त, विविध रुग्णालयांचे अधिष्ठाता तसेच वैद्यकीय अधीक्षक आणि अन्न व औषध प्रशासनाचे इतर अधिकारी, विविध प्राणवायू उत्पादक तसेच पुरवठादार या बैठकीत सहभागी झाले होते.

‘करोना रुग्णांसाठी प्राणवायूची गरज निर्माण झाली असून मुंबई त्याला अपवाद नाही. त्यामुळे अन्न व औषध प्रशासनासह प्राणवायू उत्पादक व पुरवठादार यांच्यावर असलेला ताण समजण्यासारखा आहे. मात्र, कोणत्याही परिस्थितीत मुंबईसाठी सध्या प्रतिदिन देण्यात येत असलेला २३५ मेट्रिक टन प्राणवायू साठा कमी करण्यात येऊ नये,’ असे निर्देश या बैठकीत आयुक्तांनी दिले.  त्यावर सहमती दर्शवत अन्न व औषध प्रशासन आयुक्तांनी सांगितले की, या कामी पालिकेच्या यंत्रणेला अन्न व औषध प्रशासनाकडून आवश्यक ते सर्व सहकार्य करण्यात येईल.

काटकसर करा

मुंबईतील सर्व रुग्णालयांना विशेषत: खासगी रुग्णालयांना उपलब्ध प्राणवायू साठय़ाचा योग्य आणि काटकसरीने वापर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, असे चहल यांनी स्पष्ट के ले. बैठकीत सहभागी झालेल्या प्राणवायू उत्पादक व पुरवठादार यांच्या समस्या जाणून घेतल्यानंतर आयुक्तांनी या सूचना दिल्या.

आणखी ५०० टन प्राणवायू मिळणार

विशाखापट्टणम, जामनगर आणि रायगड या तिन्ही ठिकाणांहून मिळून प्राणवायूचा सुमारे ५०० टन साठा लवकरच उपलब्ध होण्याची अपेक्षा असून त्यानंतर सर्वानाच दिलासा मिळेल, असेही त्यांनी सांगितले. तोपर्यंत प्रशासकीय यंत्रणेसह प्राणवायू उत्पादक आणि पुरवठादार यांनी ‘मिशन मोड’वर काम करावे, पालिकेने नेमलेल्या समन्वय अधिकाऱ्यांसमवेत मिळून सर्व विभागातील रुग्णालयांना वेळेवर प्राणवायू साठा पुरवावा. प्राणवायूच्या कमतरतेमुळे कोणताही अनुचित प्रसंग घडणार नाही, याची दक्षता घेणे ही सर्वांची जबाबदारी आहे, असे निर्देशही चहल यांनी यावेळी दिले.

प्रक्रिया अशी राबवणार

प्राणवायू उत्पादन स्थळापासून त्याची वाहतूक आणि मुंबईतील सर्व करोना रुग्णालये व करोना केंद्र तसेच इतर रुग्णालयांमध्ये त्याचे वितरण होईपर्यंतच्या सर्व बाबींवर देखरेख करण्यासाठी पालिकेची पथके नेमण्यात येतील.  रुग्णालयांना दररोज प्राप्त झालेला प्राणवायूचा साठय़ाची माहिती गूगल ड्राइव्हमध्ये अद्ययावत करण्याची जबाबदारी या पथकांवर सोपविण्यात आली आहे. त्यामुळे दररोज किती प्राणवायू मुंबईतील रुग्णालयांमध्ये उपलब्ध होतो, त्यावर देखरेख करता येणार आहे.