मुंबईतल्या एका कार्यक्रमात आज धर्मगुरू दलाई लामा यांनी जेव्हा योगगुरू रामदेव बाबा यांची दाढी खेचली तेव्हा सभागृहात एकच हशा पिकला. उपस्थितांना हसू अनावर होत होत होतं. मुंबईत ‘वर्ल्ड पीस अँड हार्मोनी’ या कार्यक्रमात जगभरातील दिग्गज व्यक्तींनी शांततेचा संदेश दिला. या कार्यक्रमात योगगुरू रामदेवबाबा आणि दलाई लामा यांच्यासह इतर अनेक दिग्गजही सहभागी झाले होते. सगळ्यांनी जागतिक आणि देशातील शांततेबाबत आपली मतं मांडली.

शिया मुस्लिम धर्मगुरू कस्बे सादिक यांनी बाबरी मशिदीबाबत मुस्लिमांच्या विरोधात निर्णय आला तरी तो शांततेनं स्वीकारा असंही आवाहन केलं. या कार्यक्रमात जेव्हा दलाई लामा बोलायला उभे राहिले तेव्हा त्यांनी योगगुरू रामदेवबाबांना आपल्या जवळ बोलावून घेतलं. एवढंच नाहीतर त्यांची दाढी पकडून खेचली आणि त्यांच्यासोबत काहीशी मस्करीही केली.

‘विश्व शांती’ या उद्देशानं सुरू झालेल्या या कार्यक्रमात ही दृश्यं पाहून लोक खळाळून हसले. ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेनं ही दृश्यं कॅमेरात कैद केली आहेत, त्यासंबंधीचा ट्विटही त्यांनी केला आहे. दलाई लामांच्या या कृतीमुळे रामदेवबाबांनाही योगासनं करण्याची लहर आली. त्यानंतर रामदेवबाबांनीही स्टेजवर योगासनं करून सगळ्यांची मनं जिंकली.

मुंबईत आज सकाळपासूनच हा कार्यक्रम सुरू आहे. या कार्यक्रमात योगगुरू रामदेवबाबा भाषण करत होते तेव्हा त्यांनी दलाई लामांवर स्तुतीसुमनं उधळली, चीनचा विश्वास युद्धापेक्षा शांततेवर जास्त आहे तसंच नसतं तर दलाई लामा आज या कार्यक्रमात आलेच नसते असं वक्तव्य रामदेवबाबांनी केलं. तर बाबरी प्रकरणी शिया धर्मगुरू कस्बे सादिक यांनीही आपले विचार मांडले, हिंदू बांधवांच्या बाजूनं निर्णय आला तर मुस्लिमांनी तो निर्णय स्वीकाराला पाहिजे असं आवाहन त्यांनी केलं, तर मुस्लिमांच्या बाजूनं निर्णय आला तर त्यांनी वादग्रस्त जमीन हिंदूंना द्यावी.

केंद्रीय मंत्री हर्षवर्धन यांनी या कस्बे सादिक यांच्या या वक्तव्याची प्रशंसा केली आहे. अशाच आगळ्यावेगळ्या कार्यक्रमात दलाई लामा यांनी रामदेवबाबांची दाढी खेचल्यानं उपस्थितांना हसू आवरलंच नाही. रामदेवबाबांनीही खिलाडू वृत्ती दाखवत योगासनं करून दाखवली आणि मग उपस्थितांनी टाळ्यांचा गजर केला.