समाजातील विषमतेविरुद्ध आवाज उठवणाऱ्या दलित व पुरोगामी चळवळीतील कार्यकर्त्यांना नक्षलवादी ठरवून त्यांचा पोलिसांच्या दहशतवादविरोधी पथकाकडून (एटीएस) छळ केला जात आहे, असा आरोप लेखिका ऊर्मिला पवार, नाटककार रामू रामनाथन, ज्येष्ठ पत्रकार जतिन देसाई, विद्रोही चळवळीतील कार्यकर्ते सुधीर ढवळे, श्याम सोनार यांनी पत्रकार परिषदेत केला.
महाराष्ट्रात मानवी हक्कासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करणाऱ्या एटीएसच्या विरोधात लेखक, बुद्धिवंत, कलावंत, सामाजिक-राजकीय कार्यकर्ते राज्यपालांकडे तक्रार करणार आहेत, अशी माहिती या वेळी देण्यात आली.
पुणे येथे १ सप्टेंबर रोजी अरुण भेलके व कांचन ननावरे या दोन सामाजिक कार्यकर्त्यांना नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपावरून एटीएसने अटक केली. पोलिसांनी थर्ड डिग्रीचा वापर करून त्यांच्याकडून घेतलेल्या कथित जबानीच्या आधारावर जातीअंताच्या चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या मागे चौकशीचा ससेमिरा लावला आहे, असे पवार, देसाई, रामनाथन यांनी सांगितले.
गोवंडी परिसरातील भारिप-बहुजन महासंघाचे नगरसेवक अरुण कांबळे, रिपब्लिकन पँथरचे अध्यक्ष शरद गायकवाड, राहुल सेवा मंडळाचे अध्यक्ष शंकर पाटील, कबीर कला मंचाच्या रुपाली जाधव तसेच पुण्यातील मास मूव्हमेंट या संघटनेच्या अनेक कार्यकर्त्यांना एटीएसच्या कार्यालयात बोलावून त्यांची चौकशी सुरू केली आहे. त्यांना चार-पाच तास बसवून ठवले जाते. त्यांचा मानसिक छळ केला जात आहे, असा आरोप या कार्यकर्त्यांनी केला.
विद्रोही मासिकाचे संपादक सुधीर ढवळे यांना नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपावरून अटक करून त्यांना ४० महिने तुरुंगात डांबून ठेवण्यात आले होते. मात्र १५ मे २०१४ रोजी गोंदिया सत्र न्यायालयाने त्यांची निर्दोष मुक्तता केली. तरीही त्यांना पुन:पुन्हा चौकशीला बोलावून एटीएसकडून विनाकारण मानसिक त्रास दिला जात आहे. मानवी अधिकारासाठी लढायचे नाही, जातीअंतासाठी आंदोलने करायची नाहीत, दलित अत्याचाराच्या विरोधात आवाज उठवायचा नाही, तर मग आम्ही कसे जगायचे वा वागायचे, हे एकदा सरकारने सांगावे, असे ऊर्मिला पवार म्हणाल्या. दहशतवादविरोधी पथकानेच सामाजिक कार्यकर्त्यांच्या विरोधात दहशत निर्माण केली आहे.
लवकरच त्याविरोधात निवृत्त न्यायमूर्ती पी. बी. सावंत, सुरेश होसबेस्ट, बी. जी. कोळसे-पाटील, प्रा. एन. डी. पाटील, अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर, प्रा. पुष्पा भावे, ज्येष्ठ विचारवंत आनंद तेलतुंबडे, कॉ. गोविंद पानसरे, उषा अंभोरे, सुमेध जाधव, ज. वि. पवार आदींचे शिष्टमंडळ राज्यपालांकडे दाद मागणार आहे, अशी माहिती या वेळी देण्यात आली.