01 March 2021

News Flash

उना, भीमा-कोरेगाव घडले तरीही.. दलित समाज भाजपबरोबरच राहील !

काँग्रेसचे सरकार असतानाही खैरलांजीसारख्या दलित अत्याचाराच्या घटना घडल्या आहेत

(संग्रहित छायाचित्र)

रामदास आठवले यांचा दावा; पंतप्रधानांनी गंभीर दखल घेण्याची मागणी

दलितांवरील अत्याचार काही भाजपच्याच राजवटीत वाढले असे नाही, तर काँग्रेसच्या राजवटीतही खैरलांजीसारख्या दलित अत्याचाराच्या अमानुष घटना घडल्या होत्या, त्यामुळे रोहित वेमुलाची आत्महत्या, उनातील दलित युवकांना झालेली मारहाण किंवा भीमा-कोरागावचे ताजे हल्ला प्रकरण, यांमुळे सत्ताधारी पक्षांच्या विरोधात काही प्रमाणात दलितांचा रोष असला तरी, आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांमध्ये दलित समाज भाजपच्या बाजूनेच राहील, असा दावा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री व रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी लोकसत्ताशी बोलताना केला.

भीमा-कोरेगाव हल्ल्यानंतर झालेल्या आंदोलनात केंद्रीय मंत्री असल्याने काहीसे पिछाडीवर राहिलेल्या रामदास आठवले यांना, रोहित वेमुला, उना व भीमा-कोरेगाव प्रकरणामुळे देशातील दलित समाज भाजपच्या विरोधात जात आहे काय, असे विचारले असता, त्यांनी त्याचा इन्कार केला. किंबहुना दलितांवर अत्याचार काही भाजपच्या राजवटीतच वाढले असे नाही, तर त्या आधी काँग्रेसचे सरकार असतानाही खैरलांजीसारख्या दलित अत्याचाराच्या घटना घडल्या आहेत, याकडे आठवले यांनी लक्ष वेधले.

कोणत्याही प्रकारची अन्याय-अत्याचाराची घटना घडली की, सरकारविरोधात लोक रोष व्यक्त करत असतात. या तिन्ही प्रकरणातही दलित समाजात भाजप सरकारविरोधात रोष आहे, परंतु त्यामुळे हा सर्व समाज भाजपच्या विरोधात जाईल, असे आपणास वाटत नाही, असे त्यांचे म्हणणे आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संविधान बदलणार नाही, आरक्षण रद्द केले जाणार नाही, अशी त्यांनी स्पष्ट भूमिका घेतली आहे.

त्याचबरोबर काँग्रेसच्या राजवटीत रखडलेली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची स्मारके उभारली जात आहेत, त्यात लंडन येथील बाबासाहेबांचे वास्तव्य राहिलेले घर ताब्यात घेऊन त्याचे स्मारकात रूपांतर करणे व इंदू मिलच्या संपूर्ण जमिनीवर भव्य स्मारक उभारण्याचा घेतलेला निर्णय, यांचा समावेश आहे. उनाच्या घटनेनंतर दलित समाजावर अन्याय करू नका, असे त्यांनी तथाकथित गोरक्षकांना बजावले.

भीमा-कोरेगाव प्रकरणाचीही मोदी यांनी गंभीर दखल घेऊन दलित समाज नाराज होणार नाही, याची काळजी घ्यावी, असे पक्षाला त्यांनी सांगितले आहे. मोदी यांची भूमिका दलित समाजाच्या बाजूची आहे, त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये दलित समाज भाजपच्या विरोधात जाणार नाही, असा दावा आठवले यांनी केला.

ऐक्य व्हावे ही जनतेची इच्छा

रिपब्लिकन ऐक्य व्हावे ही जनतेची इच्छा आहे, परंतु प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालीच ऐक्य होऊ शकते. त्यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची माझी तयारी आहे. परंतु आंबेडकर यांना ऐक्य मान्य नसेल, तर त्याला माझा नाइलाज आहे, अशी प्रतिक्रिया आठवले यांनी व्यक्त केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 14, 2018 2:54 am

Web Title: dalit community will stay with bjp says ramdas athawale
Next Stories
1 ‘ओएनजीसी’च्या हेलिकॉप्टरसाठी नौदलाची व्यापक शोधमोहीम
2 ..तरच मॅरेथॉनला परवानगी द्या!
3 निधीचा अन्यत्र वापर केल्यास आयुक्त, मुख्याधिकाऱ्यांवर कारवाई
Just Now!
X