महाविद्यालयीन विद्यार्थी व सामाजिक संघटनांचे नेते, कार्यकर्ते यांची मुंबईत जोरदार प्रतिकार रॅली
‘रोहित वेमुला करे पुकार, इन्कलाब झिंदाबाद’, ‘रोहितला न्याय मिळालाच पाहिजे’, ‘मनुवादी सरकार मुर्दाबाद’ या घोषणा देत सोमवारी हजारो महाविद्यालयीन विद्यार्थी व सामाजिक संघटनांचे नेते, कार्यकर्ते हैदराबाद विद्यापीठाचा विद्यार्थी रोहित याला न्याय मिळवून देण्यासाठी मुंबईच्या रस्त्यावर उतरले. या वेळी ‘छत्रपती शिवाजी टर्मिनस’ येथील वाहतूक तब्बल दोन तास बंद करावी लागली.
भायखळ्यातील जिजामाता उद्यानापासून महानगरपालिका इमारतीच्या मुख्य चौकापर्यंत आयोजित या प्रतिकार मोर्चामध्ये सुमारे दोन हजारांहून अधिक आंदोलक सहभागी झाले होते. सरकारवर दबाव आणण्यासाठी संघटना व महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा हा संयुक्त मोर्चा काढण्यात आला. यात विविध महाविद्यालयांतील विद्यार्थी मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते. चळवळीची गाणी म्हणत, हातात डफ वाजवत हे विद्यार्थी भर उन्हात रस्त्यावरील बघ्यांनाही रोहितला न्याय मिळवून देण्यासाठी मोर्चात सामील होण्याचे आवाहन करीत होते.
मुंबईतील सिद्धार्थ, रुपारेल, सेंट झेवियर्स, विवेकानंद, आंबेडकर महाविद्यालय, इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी, टाटा सामाजिक विज्ञान संस्था, निर्मला निकेतन, मुंबई विद्यापीठ, सरकारी विधि महाविद्यालय आदी शिक्षणसंस्थांमधील विद्यार्थी मोठय़ा संख्येने यात सहभागी झाले होते. याशिवाय वेगवेगळ्या आंबेडकरी व डाव्या संघटनांचे कार्यकर्ते, विद्यार्थी संघटना व राजकीय पक्षही सामील झाले होते.
‘भारिप बहुजन महासंघ’चे प्रकाश आंबेडकर, ‘भारतीय कम्युनिस्ट पक्षा’चे प्रकाश रेड्डी, आमदार कपिल पाटील, ‘रिपब्लिकन पँथर’चे सुधीर ढवळे, ‘मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षा’चे महेंद्र सिंह आणि सुमेध जाधव, सुबोध मोरे, ज्योती बडेकर आदी कार्यकर्तेही सामील झाले होते. या मोर्चामध्ये तेलंगणास्थित ‘दलित संघर्ष समिती’ही सहभागी झाली होती. ‘आज नही तो कल लेंगें, इस खून का बदला हम लेंगे’च्या घोषणा देत विद्यार्थी राग व्यक्त करीत होते. लाल व निळ्या झेंडय़ांनी व घोषणांनी संपूर्ण रस्ता गजबजला होता.
‘‘तोंड उघडण्यासाठी नाक दाबण्यासाठी प्रवृत्त करू नका. कारण जे खुर्चीवर बसवू शकतात ते खुर्चीवरून पाडूही शकतात,’’ असा इशारा प्रकाश आंबेडकर यांनी दिला. मोर्चाला वाट करून देण्यासाठी जेजे उड्डाणपूल काही काळ वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. जेजे रुग्णालयाजवळ आल्यानंतर पोलिसांनी विद्यार्थ्यांना उड्डाणपुलावरून जाण्यास सांगितले.
मात्र, विद्यार्थ्यांचा आग्रह मोहम्मद अली मार्गावरून जाण्याचा होता. परिणामी काही काळ या ठिकाणी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

रोहितच्या मित्राचीही उपस्थिती
मोर्चाच्या शेवटच्या टप्प्यावर प्रशांत धोंडा या रोहितसोबत शिकणारा विद्यार्थीही सहभागी झाला होता. ‘अभाविप’ व हैदराबाद विद्यापीठाने रोहितचा खून केला आहे. दोषींना शिक्षा होईपर्यंत आमचा संघर्ष सुरूच राहील, असे प्रशांत म्हणाला. रोहितला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही विद्यापीठाच्या आवारातच राहणार असल्याचे त्याने सांगितले. हैदराबादच्या कुलगुरूंवर ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघा’चा प्रभाव असल्यामुळेच महाविद्यालयातील आंबेडकरी विचारांच्या विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागत आहे.

रोहितला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही विरोध व विद्रोह करीत राहू. तुम्ही माणसे संपवाल, मात्र आंबेडकरी विचार संपवू शकत नाही.
सुवर्णा साळवे, विद्यार्थीनी, सिद्धार्थ महाविद्यालय