आंबेडकरी तरुणांची पोलिसांकडे मागणी

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाचे पावित्र्य भंग करणाऱ्या शिवाजी पार्क व चैत्यभूमीवर भीमगीतांच्या सीडी विकण्यासाठी ध्वनीवर्धकावरून मोठमोठय़ा आवाजात गाणी लावून गोंगाट निर्माण केला जातो, त्याला आवर घालण्याची मागणी आंबेडकरी तरुणांनी मुंबई महापालिका व पोलिसांकडे केली आहे.

६ डिसेंबर हा बाबासाहेब आंबेडकर यांचा  महापरिनिर्वाण दिन. या दिवशी संबंध देशातून आणि विदेशातूनही लाखोंच्या संख्येने आंबेडकरी अनुयायी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर येतात. हा दिवस दु:खाचा असल्याने आंबेडकरी अनुयायीही  बाबासाहेबांना आदरांजली वाहण्यासाठी येथे येतात. मात्र या दिवशी शिवाजी पार्क व चैत्यभूमीच्या मागील बाजूस काही सीडी विक्रेते, तसेच अन्नदान करणाऱ्या संघटना गाणी लावून या दिवसाचे गांभीर्यच नष्ट करून  टाकतात. त्यामुळे आंबेडकरी अनुयायांच्या भावना दुखावत आहेत, असे या तरुणांनी शिवाजी पार्क पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि दादर प्रभागाचे साहाय्यक पालिका आयुक्तांना निवेदनात दिलेल्या म्हटले आहे.

चैत्यभूमी व शिवाजी पार्कवरील गाण्यांच्या गोंगाटांमुळे  महानिर्वाण दिनाचे पावित्र्य भंग होते. त्याचबरोबर एखादे लहान मूल हरविल्यास त्याला गाण्यांच्या आवाजामुळे शोधणे अवघड होते. वृद्ध, आजारी व्यक्तींना ध्वनिवर्धकावरील मोठय़ा आवाजातील गाण्यांचा त्रास होतो. त्यामुळे हा अनावश्यक गाण्यांचा गोंगाट रोखून महानिर्वाण दिनाचे पावित्र्य व गांभीर्य अबाधित राखण्यासाठी आंबेडकरी तरुण पुढे आले आहेत. सुमारे २०० तरुणांनी या संदर्भात पोलीस व महापालिका प्रशासनाला निवेदन दिले आहे. शिवाजी पार्कवर व चैत्यभूमीवर प्रवेश देताना पोलिसांनी ध्वनिवर्धक आत नेण्यास प्रतिबंध करावा, तसेच कुणी ध्वनिवर्धक लावून गोंगाट, गोंधळ निर्माण करील, त्याच्यावर कारवाई करावी, अशी मागणी या तरुणांनी निवेदनात केली आहे.