मराठवाडय़ात यंदा चांगली पेरणी झाली; पण अनेक ठिकाणी अतिवृष्टी न होताही सततच्या पावसाने पिकांचे नुकसान झाले. त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देताना अतिवृष्टी व पुराबरोबरच सततच्या पावसाने पीक हातचे गेले असल्यास त्याचीही भरपाई मिळावी, अशी मागणी मराठवाडय़ातील शिवसेनेच्या आमदारांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली.

मराठवाडय़ात अनेक ठिकाणी नदीवर बंधाऱ्यांची गरज असून ते बांधल्यास पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होईल, असाही मुद्दा मांडण्यात आला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विभागनिहाय शिवसेना आमदारांची बैठकांची मालिका सुरू केली आहे. गुरुवारी मराठवाडय़ातील शिवसेना आमदारांची बैठक ठाकरे यांनी घेतली.

उदयसिंह राजपूत, संजय शिरसाट, तानाजी सावंत यांच्यासह मराठवाडय़ातील शिवसेनेचे आमदार या वेळी उपस्थित होते. मराठवाडय़ातून नदी जात असली तरी बंधारे कमी आहेत. त्यामुळे अनेक गावांत पाण्याचा प्रश्न निर्माण होतो, याकडे लक्ष वेधत अनेक आमदारांनी आपापल्या मतदारसंघातील बंधाऱ्यांच्या कामासाठी निधी मिळण्याची मागणी केली.

काही ठिकाणी अतिवृष्टीमुळे, तर काही ठिकाणी सततच्या पावसामुळे पिकांचे नुकसान झाले आहे; पण सरकारच्या नुकसानभरपाईच्या पत्रकात अतिवृष्टी व पुराच्या कारणासाठी मदतीचा उल्लेख असतो; पण यंदा अतिवृष्टी न होताही सतत काही दिवस पाऊस पडत राहिल्याने पिकांचे नुकसान झाल्याने त्यांनाही भरपाई मिळावी, अशी मागणी शिवसेना आमदारांनी केली. त्यावर लवकरात लवकर पंचनामे करून मदत करण्याचे निर्देश मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिले.

* औरंगाबादमधील कन्नड तालुक्यात विदर्भ-खानदेश-मराठवाडय़ाला जोडणारा भाग आहे. घाटात अनेकदा वाहतूक कोंडी होते. त्यामुळे रस्त्यांची कामे के ल्यास, समांतर रस्ते बांधल्यास या तिन्ही विभागांतील दळणवळण जलदगतीने होईल, अशी मागणीही उदयसिंह राजपूत यांनी केली.

* मराठवाडय़ातील अनेक भागांत रुग्णालयांची व्यवस्था बळकट करण्याची गरज असल्याचेही अनेक आमदारांनी बैठकीत सांगितले.