शलाका सरफरे / दिशा खातू

नवरात्रोत्सवात पारंपरिक घागऱ्याऐवजी पाश्चिमात्य-देशी मिश्रणाची ‘फॅशन’

‘घागरो जो घुमियो..’च्या तालावर घागरा घुमवत गरबा-दांडियाचा फेर रचणाऱ्या तरुणी नवरात्रोत्सवात दरवर्षी पाहायला मिळतात. मात्र इतर सर्व उत्सवांप्रमाणे नवरात्रोत्सवातील कपडय़ांच्या तऱ्हाही आता बदलत चालल्या असून यंदा बाजारात चक्क दांडिया ‘शॉर्ट्स’ (आखूड पँट) बाजारात आल्या आहेत. जड व अंगभर कपडय़ांमुळे नृत्यात येणारा बंदिस्तपणा मोडून मनमोकळेपणाने दांडिया खेळण्याची संधी देणाऱ्या ‘शॉर्ट्स’बरोबरच आतापर्यंत पुरुष परिधान करत असलेला धोती-कुर्ता ड्रेस (केडीयू) आता महिलांसाठीही उपलब्ध झाला आहे.

नवरात्रोत्सवात नृत्यासोबत वेशभूषेलाही तरुण-तरुणी अधिक महत्त्व देत असतात. घागरा, चनिया-चोली, भरजरी साडय़ा आणि त्यावर शोभून दिसणारे दागिने हा पारंपरिक वेश करण्यासाठी खास खरेदी केली जाते. त्यातही दरवर्षी नवनवीन प्रकार आणि रंगसंगती पाहायला मिळते. मात्र या पारंपरिक वेशाला आता पाश्चिमात्य स्पर्श लाभू लागला आहे. यंदा खास दांडियासाठी बांधणीच्या कपडय़ात बनवलेल्या ‘शॉर्ट्स’ बाजारात उपलब्ध झाल्या आहेत. नृत्य सादर करताना अतिशय सोयीस्कर ठरणाऱ्या या शॉर्ट्सला तरुणींकडून उत्तम प्रतिसाद मिळत असून बाजारात मागणी वाढत असल्याचे विक्रेत्यांकडून सांगण्यात येत आहे. या वर्र्षी बाजारात बांधणी िपट्रचे, अबला वर्कचे, कशिदा वर्कचे भरतकाम केलेल्या ‘शॉर्ट्स’ तरुणांच्या आकर्षणाचा विषय ठरत आहे. रंगबिरंगी धाग्यांचे भरतकाम, लहान गोंडय़ांची झालर यामुळे या पाश्चिमात्य शॉर्ट्सना अगदी देशी लूक मिळाला आहे. बाजारात साधारण ५०० ते १५०० रुपयांच्या दरम्यान या शॉर्ट्स उपलब्ध आहेत. गुजरातमधील काही व्यापारी अशा शॉर्ट्सची ऑनलाइन विक्रीही करत आहेत.

गुजराती पुरुषांचा पारंपरिक वेशभूषा म्हणून ख्याती असलेला ‘केडयू’ हा वस्त्र प्रकार यंदा महिलांसाठीही तयार करण्यात आल्याची माहिती ठाण्यातील राम मारुती रोडवरील नवरात्री वस्त्र विक्रेते रमेश शाह यांनी दिली.

लांब हाताचा गुडघ्यापर्यंतचा कुर्ता त्यावर साजेशा रंगसंगतीचे धोती पॅण्ट असे या वस्त्राचे स्वरूप असून महिलांसाठी या वस्त्र प्रकारात पिवळा, लाल, हिरवा, काळा असा गडद रंग सध्या बाजारात सर्वाचे लक्ष वेधत आहे. या वेशभूषेची किंमत १००० पासून सुरू आहेत अशी माहिती शाह यांनी दिली.

पेस्टल, फ्लोरोसिन छटांना पसंती

यंदाच्या सणा-सुदीला पेस्टल (हलक्या छटा) रंगांचे कपडे सर्वाधिक दिसून येतील. त्याचबरोबर गरबा-दांडियाला फ्लोरोसिनमधील रंग अधिक दिसतील. हे रंग रात्रीत चमकत असल्यामुळे तरुणाईला असे रंग आवडताना दिसत आहेत असे फॅशन डिझाइनर आणि रेज मेनियाच्या संचालिका शमा शहा यांनी सांगितले.

भरगच्च नक्षीकामाला आवर

चनिया चोळीसारखे नक्षीकाम असलेले कुर्ते, टय़निक, स्कर्ट अनेक दुकानांत दिसत आहेत. मात्र या कपडय़ांवर भरगच्च नक्षीकाम न करता छोटय़ा आकारात नक्षी कोरून ते कपडे अधिक उठावदार बनवण्यात आले आहेत. साधारण ९०० ते दीड हजार रुपयांपर्यंत हे कपडे उपलब्ध आहेत. पाश्चिमात्य पोषाखातील हॉल्टर गळ्याचे टॉप आता सिल्कमध्येही उपलब्ध करून देण्यात आले असून पारंपरिक नक्षीकाम केलेले हॉल्टर गळ्याचे फ्लोइंग टॉपदेखील बाजारात आले आहेत. डेनिम टॉप्सना देखील अनेकांची पसंती मिळत असल्याची माहिती भाटी फॅशन स्टोअरचे नरेश भाटी यांनी दिली.