News Flash

साचलेल्या पाण्यामुळे ‘लेप्टो’चा धोका

अतिवृष्टीदरम्यान पावसात साचलेल्या किंवा वाहत्या पाण्यातून नागरिकांना चालावे लागते.

मुंबई : पावसामुळे ठिकठिकाणी साचलेल्या पाण्यातून चाललेल्या व्यक्तींना लेप्टोस्पायरोसिस होण्याचा धोका असून या व्यक्तींनी २४ ते ७२ तासांच्या आत वैद्यकीय सल्ल्याने प्रतिबंधात्मक उपचार घ्यावेत असे आवाहन पालिकेने आहे.

अतिवृष्टीदरम्यान पावसात साचलेल्या किंवा वाहत्या पाण्यातून नागरिकांना चालावे लागते. याच पाण्यात ‘लेप्टोस्पायरोसिस या रोगाचे ‘लेप्टोस्पायरा’ (स्पायराकिट्स) या सूक्ष्मजंतूचा प्रादूर्भाव असू शकतो. उंदीर, कुत्रे, घोडे, म्हशी इत्यादी प्राण्यांच्या लघवीद्वारे (मूत्रातून) लेप्टोचे सूक्ष्मजंतू पावसाच्या पाण्यात मिसळतात. अशा बाधित झालेल्या पाण्याशी माणसाचा संपर्क आल्यास त्याला लेप्टोची बाधा होण्याची शक्यता असते. व्यक्तीच्या पायाला किंवा शरीराच्या कोणत्याही भागाला जखम असेल, अथवा साधे खरचटलेले जरी असेल; तरी अशा छोटय़ाशा जखमेतूनसुद्धा लेप्टोचे जंतू माणसाच्या शरीरात प्रवेश करतात. त्यामुळे ज्या व्यक्तींचा साचलेल्या पावसाच्या पाण्याशी संपर्क आला असेल, त्यांनी तातडीने वैद्यकीय सल्लय़ानुसार प्रतिबंधात्मक औषधोपचार घेणे गरजेचे आहे, असे पालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी सांगितले.

ज्या व्यक्ती पावसाच्या साचलेल्या पाण्यातून एकदाच चालल्या असून ज्यांच्या पायावर किंवा पाण्याशी संबंध आलेल्या शरीराच्या भागावर जखम नसेल अशा व्यक्ती लेप्टोच्या अनुषंगाने ‘कमी जोखीम’  या गटात मोडतात. अशा व्यक्तींना डॉक्टरांनी ‘डॉक्सिसायक्लीन’ (२०० मिलीग्रॅम) या कॅप्सूलचे एकदा सेवन करण्यास सांगावे. पायावर किंवा शरीरावर जखम असतानाही साचलेल्या पाण्यातून चाललेल्या व्यक्ती व्यक्ती लेप्टोच्या अनुषंगाने ‘मध्यम जोखीम’ या गटात मोडतात. या व्यक्तींना तपासणी करून डॉक्टरांनी ‘डॉक्सिसायक्लीन’ (२०० मिलिग्रॅम) या कॅप्सूलचे दररोज एक वेळा याप्रमाणे सलग तीन दिवसांसाठी द्यावी. पावसाच्या साचलेल्या पाण्यातून एकापेक्षा अधिक वेळा चाललेल्या किंवा ज्यांनी साचलेल्या पाण्यात काम केले आहे अशा व्यक्ती लेप्टोच्या अनुषंगाने अतिजोखीम या गटात मोडतात. या व्यक्तींना तपासणी करून डॉक्टरांनी ‘डॉक्सिसायक्लीन’ (२०० मिलिग्रॅम) या कॅप्सूलचे आठवडय़ातून एक वेळा याप्रमाणे सलग सहा आठवडय़ांसाठी द्यावेत. प्रतिबंधात्मक औषधोपचार हे केवळ डॉक्टरांच्या सल्ल्यानेच करणे गरजेचे आहे, अशा सूचना पालिकेने दिल्या आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 20, 2021 1:54 am

Web Title: danger of lepto due to stagnant water ssh 93
Next Stories
1 सायबर भामटय़ाकडून जवानाची फसवणूक
2 २६ जणांना जलसमाधी
3 करोना उपचारानंतर तीन महिन्यांनी लस
Just Now!
X