राष्ट्रीय उद्यानाशी असलेला संपर्क तुटण्याची शक्यता

आरे वसाहतीमध्ये गेल्या पन्नास वर्षांत अनेक प्रकल्प आल्यामुळे ना विकास क्षेत्र आक्रसत असून भविष्यात आणखी प्रकल्प आले तर त्याचा परिणाम नद्यांच्या पाणलोट क्षेत्रावर होईल, तसेच संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाशी असलेला या भूभागाचा संपर्क तुटण्याची शक्यता रहेजा वास्तुस्थापत्य संस्थेच्या संशोधन विभागाने ‘आरे मॅपिंग’ या अभ्यासात मांडली आहे.

१९४० पासून आत्तापर्यंत आरेमध्ये आलेल्या प्रकल्पांमुळे जागेचा वापर अनेकदा बदलला आहे. त्यामुळे भविष्यात होणाऱ्या परिणामांचा अभ्यास यामध्ये केला आहे. विकास आरखडा, प्रत्यक्ष ठिकाणांवर जाऊन आणि जीआयएस तंत्राचा वापर करून नकाशीकरणाचा अभ्यास करण्यात आला आहे. आरेमध्ये उगम पावणाऱ्या ओशिवरा आणि मिठी या दोन नद्यांच्या पाणलोट क्षेत्रावर भविष्यात काय परिणाम होतील याचा यामध्ये प्रामुख्याने अभ्यास करण्यात आला आहे.

अभ्यासातील नोंदीनुसार मुंबईच्या विकास आराखडय़ामध्ये दरवेळी आरेमधील ना विकास क्षेत्र घटल्याचे दर्शविले आहे. १९६४ च्या विकास आराखडय़ात १३०० हेक्टर जमीन आरेसाठी दर्शविण्यात आली होती. त्यानंतर १९८१ मध्ये त्यापैकी ९९० हेक्टर जमीन ना विकास क्षेत्र म्हणून राखीव ठेवण्यात आली, २०३४ च्या विकास आराखडय़ात पुन्हा हे क्षेत्र कमी करून ८०० हेक्टर जागा ना विकास क्षेत्र – हरित क्षेत्र म्हणून नोंदवण्यात आली.

याबरोबरच आरेमध्ये उगम पावणाऱ्या नदीपात्राच्या दोन्ही बाजूस अनेक प्रकल्पांसाठी सिमेंटची तटबंदी उभारण्यात आली असल्यामुळे एकूणच येथील पूरक्षेत्राला धोका निर्माण झाल्याचे हा अभ्यास नमूद करतो. नद्यांच्या उगम आणि सुरुवातीच्या प्रवाहात अडथळे निर्माण झाल्यास पाणी जमिनीत मुरण्यात अटकाव होऊन नदीपात्राच्या खालील भागात पूरस्थिती निर्माण होण्याचा धोका होऊ शकतो, असे हा अभ्यास म्हणतो. प्रस्तावित मेट्रो भवन, झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील बांधकामे, मेट्रो कारशेड, प्राणिसंग्रहालय अशा अनेक प्रकल्पांचा फटका पाणलोट आणि पूरक्षेत्रास बसेल याचे नकाशीकरण अभ्यासात मांडण्यात आले आहे.

कमला रहेजा विद्यानिधी इन्स्टिटय़ूट ऑफ आर्किटेक्चर अ‍ॅण्ड एन्व्हॉयरन्मेन्ट स्टडीज, मुंबईच्या संशोधन विभागाने ‘आरे मॅपिंग’ हा अभ्यास केला आहे. श्वेता वाघ, हुसैन इंदोरवाला, मीनल येरमशेट्टी हे साहाय्यक प्राध्यापक, रेश्मा मॅथ्यू आणि मिहीर देसाई या वास्तुविशारदांचा सहभाग आहे.

वन्यजीवांच्या वावरावर बंधने

दुसरीकडे भविष्यात येणारे काही प्रकल्प हे थेट संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाशी आरेचा असलेला संपर्कच तोडणारे ठरतील अशी भीती यात मांडली आहे. आरे हे राष्ट्रीय उद्यानाशी सलग जोडलेले असल्यामुळे या परिसरात बिबटय़ांपासून अनेक वन्यजीवांचा सतत वावर असतो. मात्र नव्या प्रकल्पांमुळे त्यांच्या या मुक्त वावरावर बंधने येतील. ‘आरेमधील वन्यजीवांचा वावर मोठा असून त्यांच्या अधिवासाच्या नोंदी आपल्याकडे उपलब्ध आहेत. आरेचे हे नकाशीकरण अद्ययावत असून त्यावर अधिवासाच्या नोंदी मांडल्या तर आरे हे कसे समृद्ध जंगल आहे हे सिद्ध होऊ शकेल अशी अपेक्षा या अभ्यासाचे सल्लागार आणि पर्यावरणतज्ज्ञ आनंद पेंढारकर यांनी व्यक्त केली.