मुंबईची लोकल ही प्रवासासाठी आहे की स्टंट करण्यासाठी असा प्रश्न मागील काही दिवसांपासून उपस्थित होताना दिसत आहे. रेल्वेमधून प्रवास करताना स्टंट करणाऱ्या तरुणांची संख्या मागच्या काही दिवसांपासून वाढत असल्याचे दिसत आहे. सँडहर्स्ट रोड स्थानकावर धावत्या लोकलमध्ये स्टंट करताना अशाच एका तरुणाचा व्हिडियो कॅमेरात कैद झाला आहे. लाल रंगाचा शर्ट घातलेल्या या तरुणाने लोकलमधील दांडा हाताने धरला असून त्याचे दोन्ही पाय प्लॅटफॉर्मवर घासत असल्याचे व्हिडियोमध्ये दिसत आहेत. यामध्ये त्याचा हात सटकला तर ही मजा त्याच्या जीवावर बेतू शकते. तसेच प्लॅटफॉर्मवरील लोकांसाठीही हे धोक्याचे ठरु शकते. हा व्हिडियो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

मध्य, पश्चिम आणि हार्बर अशा तिन्ही रेल्वे मार्गांवर ही स्टंटबाजी सातत्याने सुरु असल्याचे दिसते. त्यामुळे या स्टंटबाजांचा जीव तर धोक्यात असतोच पण त्यामुळे इतरांच्याही जीवाला धोका पोहचण्याची शक्यता असते. अशा हुल्लडबाजांवर कारवाई करण्याची मागणी अनेकदा प्रवासी संघटनांकडून होते. मात्र तरीही अशाप्रकारच्या स्टंटबाजीला लगाम लागताना दिसत नाही. आता हा स्ंटट करणारा नेमका कोण आहे याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही. हार्बर मार्गावर अशा घटनांचे प्रमाण आधिक आहे असे मागील काही दिवसांत घडलेल्या घटनांवरुन समोर आले आहे.

काही दिवसांपूर्वीही असाच एक व्हिडियो समोर आला होता. त्यामध्ये चार जण धावत्या लोकलमध्ये स्टंट करताना दिसत आहेत. विशेष म्हणजे यातीलच एकाने हा स्टंट सेल्फी कॅमेराने शूटही केला होता. या चौघांपैकी एकजण धावत्या ट्रेनच्या छतावर चढत असल्याचे कॅमेरात कैद झाले होते. तर इतरजण दरवाजाला आणि खिडकीला लटकल्याचे या व्हिडीओत दिसत आहे. अशाच एका हुल्लडबाज प्रवाशाने महालक्ष्मी आणि लोअर परळ या स्थानकांदरम्यान धावत्या ट्रेनच्या दारातून लाथ मारल्याने श्रावण सानप या ट्रॅकमनचा मृत्यू झाला होता.