जागतिक तापमान वाढीमुळे समुद्राची पातळी वाढली असून त्यामुळे मुंबईला धोका असल्याचे ‘नासा’ने म्हटले आहे. पुढील १०० वर्षांमध्ये मुंबईजवळील अरबी समुद्रातील पाण्याची पातळी १५.२६ सेंटिमीटरने वाढेल, असा धोक्याचा इशारा ‘नासा’ने दिला आहे. यासोबतच कर्नाटकमधील मँगलोर आणि आंध्रप्रदेशातील काकिनाडा या शहरांनाही समुद्राच्या वाढत्या पातळीमुळे धोका असल्याचे नासाने म्हटले आहे.

जागतिक तापमान वाढीमुळे पुढील १०० वर्षांमध्ये हिमनग वितळण्याची प्रक्रिया वेगात होईल. यामुळे जगभरातील महासागर, उपसागर आणि समुद्रातील पातळीत वाढ होईल. याचा सर्वाधिक धोका जपानमधील टोक्योला असेल, असा अंदाज नासाने वर्तवला आहे. येत्या १०० वर्षांमध्ये टोक्योजवळील समुद्राच्या पातळीत १७.५५ सेंटिमीटरने वाढ होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. भारताबद्दल विचार केल्यास, समुद्राच्या पातळीचा सर्वाधिक धोका मँगलोरला आहे. १०० वर्षांमध्ये मँगलोरजवळील अरबी समुद्राची पातळी १५.९८ सेंटिमीटरने वाढेल. तर आंध्रप्रदेशमधील काकिनाडा जवळच्या बंगालच्या उपसागराची पातळी १५.१६ सेंटिमीटरने वाढेल, असा अंदाज ‘नासा’ने व्यक्त केला आहे.

ग्रॅडिएंट फिंगरप्रिंट मॅपिंगच्या मदतीने नासाने समुद्र पातळीत होणाऱ्या वाढीची आकडेवारी गोळा केली आहे. समुद्राच्या किनाऱ्यावर असलेल्या जगभरातील २९३ शहरांसमोर येत्या काळात किती मोठे संकट आहे, याचा अभ्यास नासाकडून करण्यात आला. पर्यावरणासाठी काम करणाऱ्या संस्थांसाठी ही आकडेवारी महत्त्वाची ठरणार आहे. याशिवाय आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठीही ‘नासा’कडून जमा करण्यात आलेली माहिती उपयोगी ठरणार आहे.

‘आम्ही प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीमुळे नियोजनकर्ते आणि अभियंत्यांना मदत होईल. येत्या काळात जागतिक तापमान वाढीमुळे समुद्राच्या पातळीत किती वाढ होईल, याबद्दलची माहिती उपलब्ध झाल्यामुळे त्याबद्दलच्या उपाययोजना करणे शक्य होईल. पुढील काळातही आम्ही याबद्दलची सुधारित आकडेवारी देत राहू,’ अशी माहिती या अहवाल निर्मितीत सहलेखकाची जबाबदारी पार पाडणाऱ्या सुरेंद्र अधिकारी यांनी दिली.