पुनर्विकासाची मलई खाण्यासाठी इमारत धोकादायक असल्याचा खोटाच अहवाल तयार करण्याच्या वृत्तीमुळे धोकादायक इमारतींची समस्या अधिक बिकट होत चालली आहे. सल्लागाराने धोकादायक ठरवलेल्या १५ इमारतींची पालिकेच्या समितीने पाहणी केल्यावर त्यातील अनेक इमारती उत्तम स्थितीत असल्याची धक्कादायक माहिती समोर
आली आहे.
३० वर्षांहून जुन्या असलेल्या इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करून घेण्यास पालिकेकडून सांगण्यात आले होते. सल्लागाराने पाहणी करून पालिकेकडे अहवाल सादर केलेल्या १५ इमारतींची अभियांत्रिकी सेवा आणि प्रकल्पाचे संचालक लक्ष्मण व्हटकर प्रमुख असलेल्या समितीने नुकतीच पाहणी केली. तेव्हा सल्लागारांच्या अभिप्रायात आणि प्रत्यक्ष वस्तुस्थितीत कमालीचे अंतर असल्याचे लक्षात आले. यातील दोन इमारती धोकादायक असून त्या पाडण्याचा सल्ला देण्यात आला होता. प्रत्यक्षात तांत्रिक समितीने पाहणी केल्यावर त्या भक्कम स्थितीत असून पाडण्याची आवश्यकता नसल्याचे समोर आले. करी रोड येथील कामगार सेवा सदन सहकारी गृहनिर्माण संस्था आणि गोरेगाव येथील मौली भारत उद्योग भवन या दोन्ही इमारती सुस्थितीत आहेत. मात्र सल्लागारांनी त्या विरोधात अहवाल दिले होते. या दोन्ही सल्लागारांविरोधात कारणे दाखवा नोटीस काढण्यात येणार आहे, असे व्हटकर यांनी सांगितले.