मुंबईमधील ५४२ इमारती अतिधोकादायक असल्याचे महापालिकेने जाहीर केले असून यापैकी सर्वाधिक अतिधोकादायक ११६ इमारती कुल्र्यामध्ये असल्याचे निष्पन्न झाले आहे. या सर्व इमारतींमधील रहिवाशांवर घरे रिकामी करण्याचे आवाहन पालिकेने केले आहे.
 काळबादेवी, चिराबाजार परिसरात दाटीवाटीने उभ्या असलेल्या जीर्ण इमारतींमध्ये केवळ एक इमारत अतिधोकादायक असल्याचे पालिकेच्या निदर्शनास आल्याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे. दरम्यान, अतिधोकादायक इमारतींमध्ये पालिकेच्या ४४, राज्य सरकारच्या २७, तर रेल्वेच्या तीन इमारतींचा समावेश आहे. दरवर्षी पावसाळ्यापूर्वी सर्वेक्षण करून मुंबईमधील धोकादायक इमारतींची यादी पालिका जाहीर करते. यंदा पालिकेने केलेल्या सर्वेक्षणाता मुंबईतील ५४२ इमारती अतिधोकादायक अवस्थेत असल्याचे आढळून आले आहे. यामध्ये ४६८ खासगी, ४४ पालिकेच्या, २७ सरकारच्या, ३ रेल्वेच्या इमारतींचा समावेश आहे. सर्वाधिक अतिधोकादायक इमारती एल विभाग कार्यालयाच्या हद्दीमध्ये असल्याचे सर्वेक्षणात आढळून आले आहे. दक्षिण मुंबईमधील अनेक चाळी शंभर वर्षांपूर्वीच्या असून त्या जीर्ण झाल्या आहेत. काळबादेवी येथील गोकुळ हाऊसला लागलेल्या आगीमुळे येथील मोडकळीस आलेल्या इमारतीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.