एखादी जुनी इमारत कोसळल्यानंतर जागी होणारी म्हाडा नागपाडा येथील लोलीवाला इमारतही बहुधा पडण्याचीच वाट पाहत असल्याची भावना रहिवाशांची झाली आहे. १२५ वर्षे जुन्या इमारतीचा मागील काही भाग दोन दिवसांपूर्वी कोसळला आणि रहिवासी हादरले. सुदैवाने जीवितहानी झाली नसली तरी २७ कुटुंबांवर राहती घरे रिक्त करण्याची वेळ आली आहे.

या रहिवाशांची पर्यायी व्यवस्था करण्याची तसदीही म्हाडाने घेतली नाही. त्यामुळे रहिवाशांना इमारतीच्या गच्चीवर व काहींना रस्त्यावर झोपून रात्र काढावी लागली. उशिराने शहाणपण सुचलेल्या म्हाडाने आता रस घेऊन टेकू लावण्यास सुरुवात केली आहे. याशिवाय या इमारतीच्या तातडीने दुरुस्तीचे आदेश दिले आहेत.

नागपाडा येथील मौलाना आजाद मार्गावर असलेल्या या इमारतीत ५०० रहिवाशांचे वास्तव्य आहे. तब्बल ९७ कुटुंबीय राहत आहेत. मात्र या इमारतीची अवस्था इतकी दयनीय आहे की, ही इमारत कधीही कोसळू शकते. प्रत्येक घरातील पिलर, बीममध्ये  मोठमोठय़ा भेगा दिसत असतानाही म्हाडाने या इमारतीला धोकादायक घोषित केलेले नाही. या इमारतीची धोकादायक अवस्था पाहून इमारत मालकाच्या सांगण्यानुसार रहिवाशांनी २०१० मध्ये इमारतीच्या पुनर्विकासासाठी मक्र्युरी डेव्हलपर्सची नियुक्ती केली. परंतु या विकासकाने गेल्या आठ वर्षांत काहीही हालचाल केली नाही. इमारतीचा पुनर्विकास केला नाहीच. परंतु धोकादायक झालेल्या या इमारतीची दुरुस्तीही केली नाही, याकडे या रहिवाशांनी लक्ष वेधले. आता इमारत मालक रहिवाशांकडून भाडे वसूलही करीत आहे. त्यामुळे विकासकाला देण्यात आलेले ना हरकत प्रमाणपत्र रद्द करण्यात यावे, अशी मागणी लोलीवाला बिल्डिंग टेनन्टस् वेल्फेअर असोसिएशनने म्हाडाकडे वारंवार केली आहे. परंतु याकडे लक्ष द्यायलाही म्हाडाच्या अधिकाऱ्यांना वेळ नसल्याचे असोसिएशनचे म्हणणे आहे.

नुसतीच सुनावणी, कारवाईचे काय?

एकीकडे धोकादायक इमारतीतील रहिवासी घरे रिक्त करीत नाहीत, अशी तक्रार म्हाडाकडून होत असली तरी या धोकादायक इमारतीबद्दल म्हाडाला इतकी अनास्था का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. रहिवाशांचा याबाबत गेले सहा महिने म्हाडाशी पत्रव्यवहार सुरू आहे. परंतु फक्त आदेश देण्यापलीकडे म्हाडा अधिकाऱ्यांनी अजिबात रस घेतलेला नाही.

उपमुख्य अभियंता (झोन तीन) एस एन भगत आणि कार्यकारी अभियंता (ई-दोन) आनंद तोंशाळ यांच्याकडे विकासकाच्या उपस्थितीत वेळोवेळी फक्त सुनावण्या झाल्या. परंतु प्रत्यक्षात काहीही कारवाई झाली नाही. म्हाडाने विकासकाची तळी उचलून धरल्याचा गंभीर आरोप असोसिएशनने केला आहे.

रहिवाशांनी इमारतीच्या पुनर्विकासासाठी विकासकाची नियुक्ती केली होती. परंतु गेल्या आठ वर्षांत विकासकाने काहीही हालचाल केली नाही. त्यामुळे आता म्हाडाने दखल घेण्याचे ठरविले आहे. या इमारतीच्या दुरुस्तीचे आदेश जारी केले आहेत     – दिनकर जगदाळे, मुख्य अधिकारी, मुंबई इमारत व दुरुस्ती मंडळ