मुंबई-ठाण्यात एकामागोमाग एक इमारती कोसळून रहिवाशांचे प्राण धोक्यात येत असल्याच्या पाश्र्वभूमीवर शनिवारी खबरदारीचा उपाय म्हणून महापालिका प्रशासनाने ठाण्यातील श्रीरंग सोसायटीतील अतिधोकादायक इमारत पाडण्याचे काम हाती घेतले. स्थानिक रहिवाशांनी मात्र त्यास जोरदार विरोध करीत स्थानिक लोकप्रतिनिधी व प्रशासनाच्या अभद्र युतीने केलेली ही कारवाई बिल्डरधार्जिणी असल्याचा आरोप केला.
ठाणे महापालिका क्षेत्रात एकूण ६१ अतिधोकादायक इमारती आहेत. श्रीरंग सोसायटीतील सी-एक-१२ ही त्यापैकी एक होती. शुक्रवारी रात्री आठ वाजता राबोडी पोलिसांनी ही इमारत तात्काळ खाली करण्याची नोटीस रहिवाशांच्या घरावर चिकटवली होती. त्यानुसार शनिवारी सकाळी दहा वाजता पालिकेचे सहाय्यक आयुक्त अशोक बुरपुल्ले यांच्या नेतृत्त्वाखाली महापालिकेचे पथक पोलीस बंदोबस्तात तिथे दाखल झाले. त्यांनी घरांच्या खिडक्या तसेच दारे काढण्यास सुरूवात केली. तेव्हा रहिवाशांनी त्यांना विरोध केला. ‘आमची इमारत अतिधोकादायक नाही. अशाप्रकारे अधिकृत इमारतीवर कारवाई करण्याआधी अनधिकृत इमारतींवर हातोडा का मारत नाही’, असा त्यांचा सवाल होता. मात्र पोलिसांनी त्यांचा विरोध मोडून काढला. पूर्वी या इमारतीत राहणाऱ्या आणि आता बदलापूरला रहायला गेलेल्या सुप्रसिद्ध चित्रकार ज्योत्स्ना कदम कारवाईबाबत कळताच त्वरित ठाण्यात आल्या. महापालिका प्रशासनाने येथील रहिवाशांना सहा महिन्यांपूर्वी इमारत खाली करण्याची नोटीस बजावली होती, मात्र तेव्हा रहिवाशांनी नोटीस स्वीकारण्यास नकार दिला, अशी माहिती बुरपुल्ले यांनी दिली. तसेच येथील कुटुंबांनी वर्तकनगरमध्ये राहण्यासाठी दिलेल्या पर्यायी घरात जाण्यासही नकार दिल्याचे त्यांनी सांगितले.