यंत्रणा निवडणुकीच्या कामात गुंतल्याचा परिणाम

मुंबई महापालिकेतर्फे दरवर्षी पावसाळ्याच्या तोंडावर मुंबईतील धोकादायक इमारतींची यादी जाहीर केली जाते. एप्रिल महिन्यापासूनच या इमारतींचे सर्वेक्षण केले जाते. मागील दीड महिन्यापासून सुरू असलेल्या निवडणुकांच्या कामांमुळे या सर्वेक्षणाला अद्याप सुरुवातच झालेली नाही. आता निवडणुकांनंतर या इमारतींचे सर्वेक्षण करून प्रत्यक्ष त्याचा अहवाल सादर होण्यास वेळ लागणार आहे. गेल्या वर्षीच्या यादीनुसार मुंबईत तब्बल ५०० पेक्षा अधिक इमारती धोकादायक असून त्यात नव्याने इमारतींची भर पडते का आता सर्वेक्षणानंतरच कळू शकणार आहे.

शहर आणि उपनगरातील ३० वर्षे जुन्या इमारतींचे सर्वेक्षण करून त्यातील धोकादायक व अतिधोकादायक इमारतींची यादी दरवर्षी जाहीर केली जाते. परंतु, यावर्षी देखभाल विभागातील तसेच विभाग कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी निवडणूकीच्या कामावर असल्यामुळे अद्याप या सर्वेक्षणाला सुरुवात झालेली नाही. त्यामुळे सोमवारी मतदान झाल्यानंतरच प्रत्यक्षात मे महिन्यापासूनच या सर्वेक्षणाला सुरुवात होणार आहे. पावसाळा सुरू होण्यापूर्वी धोकादायक इमारतींतील रहिवाशांना नोटीसा पाठवल्या जातात. त्यानंतर काही अवधी देऊन या इमारतींचा वीजपुरवठा, पाणीपूरवठा खंडित करणे, त्यानंतर इमारती जमीनदोस्त करणे या कारवाया केल्या जातात. यंदा मात्र ही सगळीच प्रक्रिया लांबणार आहे.

धोकादायक इमारतींच्या पालिका प्रशासनाने दोन वर्षांपूर्वी धोरण जाहीर केले होते. त्यानुसार शहर व उपनगरातील सर्व खाजगी व पालिकेच्या मालकीच्या इमारतींचे सर्वेक्षण केले जाते. त्यात ज्या इमारती तत्काळ पाडून टाकणे आवश्यक आहे अशी इमारती सी-वन या प्रकारात अर्थात अतिधोकादायक म्हणून गणल्या जातात. त्याखालोखाल इमारतीच्या संरचनात्मक स्थिती नुसार सी-टू, सी-थ्री असे वर्गीकरण केले जाते. गेल्या वर्षी पालिकेने जे सर्वेक्षण केले होते, त्यात तब्बल ६१९ अतिधोकादायक इमारती आढळून आल्या होत्या. त्यानंतर सुमारे १०० इमारती पाडून टाकण्यात आल्या. तरीही ५०० पेक्षा अधिक इमारती अद्याप धोकादायक अवस्थेत उभ्या आहेत. यातील काही इमारती रिकाम्या करण्यात आल्या होत्या तर काही इमारतींवरील कारवाईला न्यायालयाने स्थगिती आदेश दिला होता. या सगळ्याचा आढावा घेऊन नव्याने यादी बनवण्यास आता वेळ लागणार आहे. या सर्व इमारतींना पुन्हा नोटिसा द्याव्या लागतील.

सर्वाधिक धोकादायक इमारती कुल्र्यामध्ये

गेल्या वर्षीच्या यादीनुसार एकूण ६१९ अतिधोकादायक इमारती आहेत. तर त्यापैकी सर्वाधिक १०६ इमारती कुर्ला एल वॉर्ड येथे आहेत. त्याखालोखाल घाटकोपरमध्ये एन वॉर्डमध्ये ५१ इमारती अतिधोकादायक आहेत.

यंदा शहर आणि उपनगरांची वेगळी यादी

यावर्षी प्रथमच शहर आणि उपनगरातील धोकादायक इमारतींची वेगवेगळी यादी जाहीर होणार आहे. त्यामुळे प्रत्यक्षात ही यादी कधी जाहीर होणार याकडे आता मुंबईकरांचे लक्ष लागले आहे.