गुजरातमधील वापी भागातून घातक रसायन घेऊन येणाऱ्या टँकर चालकांकडून कल्याण, उल्हासनगर भागांत राहणाऱ्या दलालांना आठवडय़ातून चार ते पाच हजार रुपयांची कमाई मिळते. या कमाईसाठी वालधुनी नदीकाठी राहणारे झोपडीधारक, ग्रामस्थ टँकर चालकांना गावाजवळील नदी, नाल्यात घातक रसायन ओतण्यास जागा करून देतात. यातून टँकर चालकांचा हेतू साध्य होतो आणि स्थानिकांना पैशांची कमाई होते, अशी माहिती सूत्रांनी दिली. स्थानिक दलालांचा पैशाचा हा हव्यास येथील ग्रामस्थांच्या जिवावर उठू शकतो, हे शनिवारच्या घटनाक्रमामुळे स्पष्ट झाले आहे.
वापी परिसरातून घातक रसायन घेऊन येणारे टँकर चालक, मालक वर्षांनुवर्षे हा व्यवसाय करीत आहेत. टँकर चालकांची मोठी टोळी या अवैध धंद्यात आहे. घातक रसायन तयार करणाऱ्या कंपनी अधिकाऱ्यांना गाठून त्यांच्याकडून तडजोड करून हे रसायन उचलायचे आणि त्याची विल्हेवाट लावण्यासाठी मोठाली कंत्राटे काढली जातात. पोलीस, वाहतूक पोलीस, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी आणि स्थानिक झोपडीधारक, ग्रामस्थ यांची अभद्र साखळी या अवैध धंद्याला संरक्षण देत असल्यामुळे या टँकर टोळीचे हे गैरधंदे बिनबोभाट सुरू असल्याचे बोलले जाते.
बेकायदा उद्योगधंदे करणाऱ्या उद्योजकांमुळे रसायन उद्योग बदमान होतो अशी व्यथा या भागातील काही उद्योजकांनी बोलून दाखवली. वापी परिसरातील औद्योगिक वसाहतींमध्ये प्रदूषण करणाऱ्या कंपन्यांवर कडक र्निबध लादले जातात. जाचक आणि महागडय़ा प्रक्रियेतून सुटका करून घेण्यासाठी काही रासायनिक कंपन्यांचे उद्योजक टँकर टोळीला हाताशी धरून घातक रसायनाची शेजारच्या राज्यात विल्हेवाट लावण्याची जबाबदारी सोपवत आहेत. यामध्ये टँकर टोळीला एका फेरीला सुमारे ३५ हजार रुपये मिळतात. त्यामध्ये डिझेल खर्च, रोजची मजुरी, वाहतूक, पोलीस, तपासणी नाक्यांवर चढविला जाणारा नोटांचा नैवेद्य आदीचा समावेश असतो. नदी, नाले पात्र शोधून ठेवणाऱ्या दलालांना चांगल्या रकमेची दक्षिणा चढविली जाते. हा खर्च करून टँकर चालकाला ठोक २० ते २५ हजार रुपये लाभ होतो, असे जाणकारांकडून समजते.

कारवाई शून्य
तीन ते चार वर्षांपूर्वी घातक रसायन नदीत ओतणारे टँकर ‘एमपीसीबी’च्या तत्कालीन ‘प्रामाणिक’ अधिकाऱ्यांनी पकडले होते. मात्र अशा घातक रसायनांचा धंदा करणाऱ्यांना शिक्षा झाल्याचे पोलीस, ‘एमपीसीबी’च्या अधिकाऱ्यांनी सांगितले नाही.

पोलीस, ‘एमपीसीबी’कडून चालकांची पाठराखण
वापीमधून रात्रीच्या वेळेत कल्याण, उल्हासनगरमध्ये घातक रसायन घेऊन आलेले टँकर नदी, नाल्यात रसायन ओतून झाले की बाजूच्या ढाबे, वाहन दुरुस्ती केंद्रावर चालक आरामासाठी थांबतात. या काळात पोलीस, प्रदूषण नियंत्रण मंडळ अधिकाऱ्यांचे स्थानिक दलाल या टँकर चालकांच्या ‘भेटी’ घेऊन निघून जातात.