मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसजवळील हिमालय पादचारी पुलाच्या दुर्घटनेत ६ जणांचा हकनाक बळी गेल्यानंतर पालिका प्रशासन आता कामाला लागले आहे. दक्षिण मुंबईतील चंदनवाडी येथील धोकादायक पादचारी पूल पाडण्यात आला आहे. पालिकेच्या सी वॉर्ड कार्यालयाने बुधवारी मध्यरात्री या पुलाचा सांगाडा पाडून टाकला. याच परिसरात अजून एक पूल धोकादायक अवस्थेत असून तो देखील लवकरच पाडून टाकण्यात येणार आहे.

गेल्यावर्षी महापालिकेने मुंबईतील पुलांची संरचनात्मक तपासणी केली होती. त्यात मुंबईतील १८ पूल धोकादायक आढळले होते. हे पूल पाडून त्याची पुनर्बाधणी करण्याची शिफारस करण्यात आली होती. त्यापैकी ११ पूल आजही धोकादायक अवस्थेत उभे आहेत. यापैकी दोन पूल दक्षिण मुंबईत मरिन लाइन्स स्थानकाजवळ चंदनवाडी येथे आहेत. हे पूल पादचाऱ्यांसाठी बंद असले तरी पुलाच्या खालून मोठय़ा प्रमाणावर वाहतूक सुरू असते. त्यामुळे कधीही मोठी दुर्घटना होऊ शकते याची भीतीही व्यक्त करण्यात आली होती. या पाश्र्वभूमीवर पूल विभागाने सर्व संबंधित विभाग कार्यालयांना धोकादायक पूल पाडून टाकण्याची कारवाई करण्याबाबत कळवले होते.

रंगपंचमीच्या सुट्टीचे निमित्त साधून पालिकेच्या कार्यालयाने मध्यरात्री ही कारवाई सुरू केली व पहाटे ५ पर्यंत पूर्ण पूल पाडला. चंदनवाडी येथील या पुलाचा अनेक पादचारी वापर करीत होते. भुलेश्वर, दवा बाजारला जाणाऱ्यांना चंदनवाडी स्मशानभूमीतून जाण्यास मार्ग आहे. मात्र गेल्या सहा महिन्यांपासून हा पूल वापरासाठी बंद होता.

मरिन लाइन्स स्थानकाच्या दक्षिण दिशेला असलेला एक पूल अजून पाडायचा आहे. एकूण मुंबईत असे १० पूल धोकादायक अवस्थेत असून ते पाडण्यासाठी वाहतूक पोलिसांची परवानगी लागणार असल्यामुळे आठवडय़ाभराचा अवधी लागण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.