धोकादायक पादचारी पूल बंद करण्याचा रेल्वेचा निर्णय; ‘एमसीए’ची ढिलाई

मुंबई : दक्षिण मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये जाणाऱ्या क्रिकेट रसिकांसाठी चर्चगेट आणि मरिन ड्राइव्ह रेल्वे स्थानकांदरम्यान उभारलेले दोन पादचारी पूल धोकादायक बनले असून या पुलांची पुनर्बांधणी करण्याच्या सूचनेकडे मुंबई क्रिकेट असोसिएशनने (एमसीए) दुर्लक्ष केल्यामुळे अखेर रेल्वे प्रशासनाने ते वापरासाठी बंद केले आहेत. त्यामुळे आता क्रिकेटचा सामना पाहण्यासाठी स्टेडियममध्ये जाणाऱ्या रसिकांना द्राविडीप्राणायाम घडणार आहे.

चर्चगेट परिसरातील विनू मंकड मार्गावर रेल्वे मार्गालगत १९७४-७५ च्या सुमारास शेषराव कृष्णराव वानखेडे स्टेडियम उभारण्यात आले. त्यानंतर क्रिकेटचे अनेक सामने या मैदानावर खेळले गेले. क्रिकेट विश्वाातील अनेक दिग्गज खेळाडूनी हे मैदान गाजवले. या मैदानात जाण्यासाठी चर्चगेटजवळील विनू मंकड मार्गावर प्रवेशद्वार आहे. मैदानात प्रवेश करणाऱ्या  रसिकांची गर्दी विभागली जावी आणि पूर्व भागातून येणाऱ्या रसिकांना द्राविडीप्राणायाम घडू नये या उद्देशाने चर्चगेट आणि मरिन ड्राइव्ह रेल्वे स्थानकांदरम्यान महर्षी कर्वे मार्गावरून थेट स्टेडियममध्ये जाण्यासाठी दोन पादचारी पूल बांधण्यात आले होते.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसजवळील हिमालय पूल कोसळल्यानंतर पालिका प्रशासनाने मुंबईतील पुलांची संरचनात्मक तपासणी करण्याचे आदेश दिले. महर्षी कर्वे मार्गावरून वानखेडे स्टेडियममध्ये जाणाऱ्या पादचारी पुलांची आयआयटी, मुंबई या संस्थेने तपासणी केली. पुलांच्या संरचनात्मक तपासणीचा अहवाल १६ मे २०१९ रोजी मुंबई क्रिकेट असोसिएशनचे प्रमुख कार्यकारी अधिकाऱ्यांना पाठविण्यात आला होता. एका वर्षाच्या आत या दोन्ही पुलांची पुनर्बांधणी करण्याची शिफारस या अहवालात करण्यात आली होती.

अहवालातील शिफारशीनुसार मे २०२० पर्यंत पुलांची पुनर्बांधणी करणे अपेक्षित होते. करोना संसर्गामुळे मार्च २०२० नंतर टाळेबंदी लागू झाली. दरम्यानच्या काळात टाळेबंदी टप्प्याटप्प्याने शिथिलही झाली. तरीही आजतागायत या पुलांच्या पुनर्बांधणीचे काम हाती घेण्यात आलेले नाही.

हे धोकादायक पूल कोसळल्यास चर्चगेट आणि मरिन ड्राइव्ह दरम्यानची लोकलसेवा ठप्प होण्याचा धोका आहे. ही बाब लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने मुंबई क्रिकेट असोसिएशनला पुलांच्या पुनर्बांधणीसाठी स्मरणपत्र पाठविले होते. परंतु अद्याप पुलांची स्थिती ‘जैसे थे’ आहे. त्यामुळे अखेर रेल्वेने हे दोन्ही पादचारी पूल वापरासाठी बंद केले आहेत. माहितीचा अधिकार कार्यकर्ते शरद यादव यांनी मागविलेल्या माहितीद्वारे हा प्रकार उघडकीस आला आहे. आता महर्षी कर्वे मार्गावरून स्टेडियममध्ये जाण्याचा मार्ग बंद झाला आहे. तूर्तास वानखेडे स्टेडियममध्ये क्रिकेटच्या सामन्यांचे आयोजन नसल्यामुळे त्याचा परिणाम जाणवणार नाही. मात्र भविष्यात होणाऱ्या सामन्यांच्या वेळी क्रिकेट रसिकांना विनू मंकड मार्गावरील प्रवेशद्वारातूनच स्टेडियममध्ये जावे लागणार आहे.