एसटीकडून ‘ब्लॅक स्पॉट’बाबतचा अहवाल सादर; सर्वाधिक धोकादायक ठिकाणे मुंबई विभागात

‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ हे ब्रीदवाक्य मिरवत राज्यभरात प्रवासी वाहतूक करणाऱ्या एसटी महामंडळासाठी या राज्याच्या रस्त्यावरील १२१० ठिकाणे जीवघेणी असल्याचे एसटी महामंडळाच्या पाहणीतच समोर आले आहे. एसटी महामंडळाने याबाबत राज्य परिवहन विभागाला सादर केलेल्या अहवालात या अहवालांची  यादीच देण्यात आली आहे. या यादीनुसार एसटीसाठीची धोकादायक ठिकाणे मुंबई विभागात सर्वात जास्त आहेत, तर नागपूर विभागात हा आकडा सर्वात कमी आहे.

२०१२-१३ ते २०१४-१५ यांदरम्यान एसटी महामंडळात दर लाख किलोमीटरमागे अपघातांचे प्रमाण ०.१५ टक्के एवढे होते. हे प्रमाण कमी होऊन २०१५-१६ या वर्षांत ०.१४ टक्क्यावर आले आहे. २०१४-१५ या वर्षांत ४९५ लोक दगावले होते. तर २०१५-१६ या वर्षांत ही संख्या ४०७ जणांचा मृत्यू झाला. अपघातांचे हे प्रमाण याहीपेक्षा कमी असले पाहिजे, असे मत एसटीतील अधिकारी व्यक्त करीत आहेत. त्याशिवाय एसटीचे अध्यक्ष व परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनीही सुरक्षित प्रवासाचा आग्रह धरला आहे.

या पाश्र्वभूमीवर एसटी महामंडळाच्या या अहवालानुसार मुंबई विभागात (ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड) ३९२ ठिकाणे धोकादायक आहेत. त्याखालोखाल नाशिक विभागात (अहमदनगर, धुळे, नाशिक, जळगाव) २८६ ठिकाणे नोंदवण्यात आली आहेत. सर्वात कमी अपघाती ठिकाणे नागपूर (७२) विभागात आहेत. या १२१० ठिकाणांपैकी एकटय़ा सिंधुदुर्ग जिल्ह्यांत १३६ ठिकाणांची नोंद झाली आहे, तर अहमदनगरमध्ये १८० धोकादायक ठिकाणे आहेत.

potholes1-chart