बोरिवलीतील एमके शाळेविरोधात पालकांचा मोर्चा

बोरिवली पश्चिमेकडील फॅक्टरी लेन येथील ‘मातोश्री काशीबेन व्रजलाल वालिया इंटरनॅशनल स्कूल’ (एम.के.व्ही.व्ही.) या शाळेची इमारत धोकादायक असल्याचे कारण देत शाळेच्या प्रशासनाने इथले वर्ग बोरिवली पूर्वेकडील सेठ जी. एच. हायस्कूलमध्ये भरविण्याचा घाट घातला आहे. मात्र, शाळेची नवीन जागा गैरसोयीची व विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने योग्य नसल्याचे कारण देत पालकांनी स्थलांतराला विरोध दर्शविला आहे. शाळेचा निर्णय मनमानी असल्याचा आरोप करीत पालकांनी या विरोधात गुरुवारी शाळेविरोधात जोरदार मोर्चा काढला.

१७ जुलै रोजी एम.के.व्ही.व्ही. इंटरनॅशनल शाळेच्या प्रशासनाने शाळेच्या सूचनाफलकावर शाळेची इमारत धोकादायक स्थितीत असल्याची नोटीस लावली. तसेच, १६ ऑगस्टपासून शाळेचे वर्ग बोरिवली पूर्वेकडील सेठ. जी. एच. हायस्कूलमध्ये सकाळच्या सत्रात भरतील, असे या नोटिशीद्वारे पालकांना कळविण्यात आले. ही शाळा केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाशी (सीबीएसई) सलग्नित आहे. सीबीएसईनेही शाळेच्या तात्पुरत्या स्थलांतराला मान्यता दिली असल्याचे या नोटिशीत नमूद करण्यात आले होते.

या शाळेत पहिली ते दहावीच्या वर्गामध्ये तब्बल दोन हजार विद्यार्थी शिकत आहेत. स्थलांतराची बाब कळताच अनेक पालकांनी प्रशासनाकडे याबाबत नाराजी व्यक्त केली. बहुतांश पालक बोरिवली पश्चिमेला राहतात. बोरिवली पूर्वेकडे दररोज पाल्याला पाठविणे गैरसोयीचे असल्याने या ठिकाणी वर्ग स्थलांतरित करण्यात येऊ नये, असा त्यांचा आक्षेप आहे. तसेच बोरिवली पूर्वेकडे ज्या परिसरात शाळेचे वर्ग भरणार आहेत, त्या परिसरात अनेक बार आहेत. त्यामुळे मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित करीत नव्या ठिकाणी आपल्या पाल्याला धाडण्यास पालकांचा विरोध आहे. त्याऐवजी शाळेच्या बाजूला असलेल्या इमारतीत वर्ग स्थलांतरित करण्याची मागणी पालकांनी केली आहे. शाळेच्या निर्णयाविरोधात मोठय़ा संख्येने पालक गुरुवारी सकाळी बोरिवली स्थानकाजवळ जमले. त्यानंतर मोक्ष प्लाझामार्गे फॅक्टरी लेनपर्यंत ‘वी वाँट जस्टिस’ अशी घोषणाबाजी करीत पालकांनी शाळेवर मोर्चा नेला. पालकांच्या उद्रेकाबाबत शाळा प्रशासनाची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र वारंवार संपर्क साधूनही शाळा प्रशासनाची प्रतिक्रिया उपलब्ध होऊ शकली नाही.

‘गेल्या सहा वर्षांपासून शाळेच्या इमारतीच्या नूतनीकरणाची चर्चा सुरू आहे. त्यासाठी शाळा प्रशासनाने शालेय शुल्कामध्ये वाढही केली आहे. आमचा नूतनीकरणाला विरोध नाही. मात्र पश्चिमेकडे असलेली शाळा पूर्वेकडे स्थलांतरित करण्याला आमचा विरोध आहे,’ अशी प्रतिक्रिया या शाळेतील देवेन रघाणी या पालकाने दिली.