तांबे चौकानजीक पालिका ‘दर्शन गॅलरी’ उभारणार

नरिमन पॉइंटपासून गिरगाव चौपाटीचे ‘याचि देही, याचि डोळा’ दर्शन घेता यावे यासाठी मलबार हिलच्या पायथ्याशी तांबे चौकानजीक एक ‘दर्शन गॅलरी’ उभारण्यात येणार आहे. पालिकेच्या या दर्शन गॅलरीला पुरातन वास्तू वारसा समितीकडून तत्त्वत: मंजुरी मिळाली आहे. आता न्यायालयाने नियुक्त केलेल्या उच्चाधिकार समितीच्या परवानगीची पालिकेला प्रतीक्षा आहे.

मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यावर फेरफटका मारण्यासाठी मोठय़ा संख्येने मुंबईकर, तसेच देशी-विदेशी पर्यटक येऊ लागले आहेत. गिरगाव चौपाटी, मरिन ड्राइव्ह, नरिमन पॉइंट परिसरांत दिवसभर देशी-विदेशी पर्यटकांची गर्दी होऊ लागली आहे. संध्याकाळनंतर नरिमन पॉइंट ते गिरगाव चौपाटीपर्यंत पसरलेल्या ‘राणीच्या हारा’चे दर्शन घेण्यासाठीही अनेक मंडळी चौपाटीवर येत असतात. पर्यटकांना अथांग सागर आणि  किनाऱ्यालगतच्या ‘राणीच्या हारा’चे दर्शन घेता यावे यासाठी पालिकेने मलबार हिलच्या पायथ्याशी तांबे चौकाजवळ किनाऱ्यालगत एक मोठी दर्शन गॅलरी उभारण्याचा निर्णय घेतला आहे. या दर्शन गॅलरीचा आराखडा तयार करण्यात आला आहे. दर्शन गॅलरीच्या उभारणीसाठी तांबे चौकात पदपथावर असलेली पोलीस चौकी एका बाजूला हलवावी लागणार आहे. तसेच पदपथावर सुटसुटीत आखणी, आसनव्यवस्थाही तयार करावी लागणार आहे. पालिका आयुक्त, पोलीस आयुक्त आणि पुरातन वास्तू वारसा समितीचे अध्यक्ष यांच्या त्रिसदस्यीय समितीने ‘दर्शन गॅलरी’च्या संकल्पचित्रास तत्त्वत: मान्यता दिली आहे.

या ‘दर्शन गॅलरी’तून पर्यटकांना संपूर्ण चौपाटीचे दृश्य पाहता येईल. पुरातन वास्तू वारसा समिती आणि उच्चाधिकार समितीकडून अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर आकर्षक अशी सर्व सुविधांनीयुक्त ‘दर्शन गॅलरी’ उभारण्याचे काम सुरू करण्यात येईल.

– विश्वास मोटे, साहाय्यक आयुक्त, ‘डी’ विभाग कार्यालय