25 November 2017

News Flash

‘सरकारी’ दारूअड्डा

काही दारूडे या ठिकाणी नशा करण्यासाठी येत असल्याची माहिती एका दुकानदाराने दिली.

समीर कर्णुक, मुंबई | Updated: September 14, 2017 4:08 AM

चेंबूरमध्ये समाज कल्याण कार्यालय इमारतीत बाटल्यांचा ढीग

राज्य सरकारच्या विविध खात्यांची कार्यालये असलेली चेंबूरमधील समाज कल्याण कार्यालयाची इमारत आणि आजूबाजूचा परिसर सध्या दारूडय़ांचा अड्डा बनला आहे. सायंकाळनंतर या ठिकाणी अनेक जण नशा करण्यासाठी बसलेले आढळून येतात. याच इमारतीमध्ये परिमंडळ-६ चे पोलीस उपायुक्त आणि साहाय्यक पोलीस आयुक्तांचे कार्यालय आहे.

सार्वजनिक बांधकाम खात्याच्या मालकीच्या इमारतीच्या तळमजल्यावर सार्वजनिक बांधकाम सेवा केंद्र आणि शिधावाटप कार्यालय आहे. पहिल्या मजल्यावर उद्वाहक निरीक्षक कार्यालय, उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग कार्यालय आहे. तर दुसऱ्या मजल्यावर अधीक्षक अभियंता मुंबई बांधकाम विभाग, शिक्षण विभाग आणि अल्पबचत संचालनालय यांचे कार्यालय आहे. तिसऱ्या मजल्यावर विद्युत निरीक्षक आणि अण्णा भाऊ साठे महामंडळाचे कार्यालय आहे. याशिवाय चौथ्या मजल्यावर विशेष जिल्हा समाजकल्याण अधिकारी कार्यालय, महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्तीय व विकास महामंडळाचे कार्यालय आहे.

राज्य शासनाअंतर्गत येणाऱ्या अनेक विभागांची ही महत्त्वाची कार्यालये या ठिकाणी असल्याने इमारतीत व परिसरात रोजच मोठी गर्दी असते. याशिवाय पोलिसांची देखील या ठिकाणी नेहमी ये-जा असते. तरीही या इमारतीच्या परिसरात अशा प्रकारे दारूचे अड्डे सुरू असल्याने रहिवाशांकडून संताप व्यक्त केला जात आहे. सरकारी कार्यालयेच जर सुरक्षित नसतील तर काय, असा प्रश्न विचारला जात आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग या ठिकाणी पूर्णपणे  दुर्लक्ष करीत आहे. या इमारतीच्या संरक्षण भिंतींचीही ठिकठिकाणी पडझड झाली आहे. त्यामुळे काही दारूडे या ठिकाणी नशा करण्यासाठी येत असल्याची माहिती एका दुकानदाराने दिली.

सुरक्षा वाऱ्यावर

अनेक महत्त्वाच्या खात्यांची या ठिकाणी कार्यालये आहेत. परंतु, त्यांची सुरक्षा ‘रामभरोसे’ आहे. एकाही कार्यालयाबाहेर आणि इमारतीच्या मुख्य प्रवेशद्वारावर सुरक्षारक्षक नाही. त्यामुळे एखादी अनुचित घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. याशिवाय याच इमारतीच्या मागे पालिकेचे रुग्णालय आहे. याच रुग्णालयासमोर ‘दारूकाम’ सुरू असते. त्यामुळे या ठिकाणी एखादी दुर्घटना घडल्यावरच प्रशासनाला जाग येईल का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

First Published on September 14, 2017 4:08 am

Web Title: daru adda in samaj kalyan office chembur