ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काउन्सिलचे (बार्क) माजी मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) पार्थ दासगुप्ता टेलिव्हिजन रेिटंग पॉइंट्स (टीआरपी) घोटाळ्याचे मुख्य सूत्रधार आहेत. पार्थ यांनी एआरजी आउटलायर कं पनीचे संचालक आणि रिपब्लिक वृत्त वाहिनीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांच्यासोबत संगनमताने कट रचत टीआरपी घोटाळा के ल्याचा आरोप गुन्हे शाखेने पुरवणी आरोपपत्राद्वारे ठेवला.

टीआरपी घोटाळ्याप्रकरणी  आतापर्यंत १५ आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यापैकी १२ आरोपींविरोधात याआधी आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. सोमवारी पार्थ यांच्यासह ‘बार्क’चे माजी मुख्य परिचलन अधिकारी  रोमील रामगडिया आणि एआरजी आउटलायर कं पनीचे सीईओ विकास खानचंदानी यांच्याविरोधात गुन्हे शाखेने ३६०० पानांचे पुरवणी आरोपपत्र सादर के ले. दासगुप्ता, रामगडिया यांची संशयास्पद कृ ती लक्षात आल्यानंतर ‘बार्क’ने स्वतंत्र आस्थापनेकरवी टीआरपी मोजणीबाबत फॉरेन्सिक ऑडिट करून घेतले. त्याचा अहवाल आरोपपत्रात प्रमुख पुरावा म्हणून जोडण्यात आला आहे. या ऑडिटदरम्यान दासगुप्ता, रामगडिया यांनी वास्तवात टीआरपी अधिक असलेल्या इंग्रजी वृत्तवाहिनीस खाली खेचून रिपब्लिक वाहिनीस वरचढ ठरविण्यासाठी के लेली कृती, एआरजी कंपनीच्या (रिपब्लिक वाहिन्यांची प्रवर्तक कंपनी) संचालक, अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांमधील व्हॉट्सअ‍ॅप, ई-मेलआधारित संवादही आरोपपत्रात पुरावा म्हणून जोडल्याचे  वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

पार्थ यांनी एआरजीचे संचालक, रिपब्लिक वाहिन्यांचे मुख्य संपादक अर्णब यांच्याशी संगनमत केले, कट रचला, ‘बार्क’मधील आपल्या पदाचा गैरवापर करून टीआरपी मोजणीची पद्धत, तंत्र बदलले. अन्य वरचढ ठरणाऱ्या वाहिन्यांचे टीआरपी विश्लेषणातून गाळले. विश्लेषण न करताच टीआरपी जाहीर करून रिपब्लिकला वरचढ ठरिवले. प्रतिस्पर्धी वाहिन्यांची गुपिते रिपब्लिकसमोर फोडली, असे आरोप ठेवले आहेत.

मनोरंजन वाहिन्यांवर लक्ष

वृत्तवाहिन्यांसोबत सर्वसाधारण मनोरंजन वाहिन्या (जनरल एण्टरटेन्मेण्ट चॅनेल) आणि क्रीडा वाहिन्यांनीही टीआरपी वाढविण्यासाठी गैरमार्ग अवलंबल्याची माहिती पुढे आल्याचा दावा गुन्हे शाखेने के ला. अशा १२ ते १३ वाहिन्या असून त्याबाबत तपास सुरू करण्यात आल्याचे गुन्हे शाखेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. दोन दाक्षिणात्य वृत्त वाहिन्यांच्या चालक, मालकांकडेही चौकशी केली जाईल, असेही या अधिकाऱ्याने स्पष्ट केले.

संशयितांचा शोध सुरू

आरोपपत्रात एआरजी आउटलायरच्या सीओओ प्रिया मुखर्जी यांच्यासह रिपब्लिक वाहिन्यांशी संबंधित शिवा सुंदरम, शिवेंदू मुल्हेरकर, रणजीत वॉल्टर आणि अन्य व्यक्ती संशयित आरोपी असून त्यांचा शोध सुरू असल्याचे  म्हटले आहे. फरारी आरोपींमध्ये महामूव्ही वाहिनीशी संबंधित दोघांचाही समावेश आहे.