टीआरपी घोटाळा

टीआरपी घोटाळ्याप्रकरणी अटकेत असलेले ‘बार्क’चे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी पार्थो दासगुप्ता यांना शुक्रवारी सायंकाळी जेजे रुग्णालयातून सोडण्यात आल्यावर लगेच त्यांच्या वकिलाने उच्च न्यायालयात धाव घेतली. तसेच दासगुप्ता यांना प्रकृतीच्या कारणास्तव निदान दोन दिवसांचा तातडीचा अंतरिम जामीन देण्याची मागणी के ली. न्यायालयानेही दासगुप्ता यांच्या याचिकेवर तातडीने सुनावणी घेत त्यांचे वैद्यकीय अहवाल सोमवापर्यंत सादर करण्याचे आदेश राज्य सरकारला दिले.

न्यायमूर्ती पी. डी. नाईक यांच्या वैयक्तिक कक्षात याबाबतची याचिका सादर करण्यात आली व याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्याची विनंती केली. त्यानंतर काही वेळ सुनावणी झाली. त्या वेळी दासगुप्ता यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्यावर त्यांची तळोजा कारागृहात रवानगी करण्यात आली. दासगुप्ता हे मधुमेही असून गेल्या आठवडय़ात त्यांच्या शरीरातील साखरेचे प्रमाण कमी झाले आणि ते बेशुद्ध पडले. त्यानंतर त्यांना जे जे रुग्णालयात हलवण्यात आले. तेथे आठवडाभर उपचार घेतल्यानंतर दासगुप्ता यांना शुक्रवारी सायंकाळी रुग्णालयातून सोडण्यात आले. मात्र त्यांना स्ट्रेचरवरून कारागृहात नेण्यात आले. त्यांची प्रकृती ठीक असती तर त्यांना अशा प्रकारे रुग्णालयातून कारागृहात नेण्यात आले नसते. त्यामुळेच कारागृहात दासगुप्ता यांची प्रकृती आणखी बिघडण्याची शक्यता व्यक्त करत त्यांची निदान दोन आठवडय़ांचा तातडीच्या अंतरिम जामिनावर सुटका करण्याची मागणी दासगुप्ता यांचे वकील अर्जुनसिंह ठाकूर यांनी न्यायालयाकडे केली.

तर जेजे रुग्णालयाने दासगुप्ता यांची प्रकृती ठीक असल्याचे प्रमाणपत्र  देऊन त्यांना रुग्णालयातून सोडण्यात आल्याचा तसेच नियमानुसार त्यांना तळोजा कारागृह रुग्णालयात हलवण्यात आल्याचा दावा सरकारी वकील दीपक ठाकरे यांनी केला.