एटीएमकार्डाचा डेटा चोरून लाखो रुपये उकळणाऱ्या हॅकर्सने विविध बँकांच्या ६ एटीएम सेंटरमधून हजारो ग्राहकांचा डेटा चोरल्याची माहिती समोर आली आहे. दक्षिण मुंबईतील अ‍ॅक्सिस बँकेबरोबरच कॉर्पोरेशन बँकेच्या एका आणि इंडसइंड बँकेच्या चार एटीएम सेंटरमध्ये स्कीमर उपकरण लावून डेटा हॅक करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे.
याबाबत माहिती देताना पोलीस उपायुक्त रवींद्र शिसवे यांनी सांगितले की, हॅकर्सनी कुलाबा येथील एक्सिस बँकेच्या एटीएम सेंटरमध्ये स्कीमर उपरकरण बसवले होते. ६, ९, ११, १२, १४ आणि १६ एप्रिल रोजी या एटीएम सेंटरमध्ये स्कीमर लावून बँकेत येणाऱ्या ग्राहकांच्या एटीएम कार्डातील डेटा चोरण्यात आला होता. तपासादरम्यान दक्षिण मुंबईतील कॉर्पोरेशन बँकेचे एक एटीएम आणि इंडसइंड बँकेच्या ४ एटीएममध्येही स्कीमर लावून डेटा चोरल्याची बाब समोर आली आहे. या ६ एटीएम सेंटरमधून हजारो ग्राहकांच्या एटीएम कार्डाचा डेटा चोरला गेला आहे. परंतु अ‍ॅक्सिस बँक वगळता अद्याप एकाही बँकेने पोलिसांकडे गुन्हा दाखल केला नाही. यामुळे त्यांच्यावरही कारवाई केली जाऊ शकते, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. या पाच एटीएम सेंटरमधील हॅकिंग प्रकरणी ५ पोलीस ठाण्यात स्वतंत्र गुन्हे दाखल केले जाणार असल्याचे उपायुक्त शिसवे यांनी सांगितले.
डेटा चोरणारे आरोपी बल्गेरियाचे नागरिक असून ते कुलाब्याच्या अपोलो आणि वरळीच्या फोर सिझन या पंचतारांकित हॉटेलात वास्तव्यास होते.