मोबाईल फोनवर येणाऱ्या डेटिंग वेबसाईटच्या जाहीरातींवर क्लिक करण्याचा मोह काही जणांना आवरत नाही. मध्य मुंबईतील एका विवाहित बँकरला अशाच डेटिंग वेबसाईटच्या जाहीरातींवर क्लिक करणे चांगलेच महाग पडले आहे. डेटिंग वेबसाईटसाठी काम करणारे ऑपरेटर असल्याचे भासवून चौघांनी या बँकरला तब्बल १२.५५ लाख रुपयांना फसवले. पैशांच्या मोबदल्यात सुंदर तरुणीसोबत डेटिंगला जाण्याचे आमिष दाखवून या बँकरची फसवणूक करण्यात आली.

फसवणूक झालेल्या व्यक्तिने दादर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. संबंधित व्यक्तिच्या मोबाईल फोनवर २१ मे ला पहिली डेटिंगची जाहीरात झळकली. त्यामध्ये महिलेसोबत डेटची खात्री देण्यात आली होती. त्याने ती जाहीरात क्लिक केली व स्वत:चटे नाव, वय, शहर आणि मोबाईल नंबर दिला. मी माझ्या डिटेल्स दिल्यानंतर काही मिनिटातच मला तान्या नावाच्या महिलेचा फोन आला.

त्या महिलेने कंपनी तुम्हाला सुंदर महिलेसोबत डेटला जाण्याची संधी देईल असे सांगितले. या डेटिंगची फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये व्यवस्था करण्यासाठी त्याला आगाऊ पैसे भरण्यास सांगण्यात आले. तो पैसे भरण्यासाठी तयार झाला. काही लाखांमध्ये ही रक्कम होती. ३.४० लाख रुपये तीन हप्त्यांमध्ये भरण्यास मला सांगण्यात आले. २३ मे ते २६ मे या कालावधीत काही लाख रुपये त्याने भरले. त्यानंतर ५.२४ लाख रुपये भरले तर आतापर्यंत भरलेली सर्व रक्कम परत मिळेल असे सांगण्यात आले.

५.२४ लाख रुपये भरल्यानंतरही डेटिंगची संधी मिळत नसल्याचे लक्षात आल्यानंतर त्याने सर्व पैसे परत मागायचे ठरवले. २९ मे रोजी त्या व्यक्तिने वेबसाईटला ई-मेल पाठवला व त्याचे अकाऊंट रद्द करुन सर्व पैसे परत करण्यास सांगितले. त्यावेळी ऋषी नावाच्या व्यक्तिचा फोन आला व आणखी पैसे भरल्याशिवाय अकाऊंट डिलिट करता येणार नाही असे सांगितले.

उलट कंपनीनेच त्याला पोलिसांकडे घेऊन जाण्याची धमकी दिली. घाबरलेल्या त्या बॅकरने आणखी दोन लाख रुपये भरले. त्याने एकूण १२.५५ लाख भरले. आपली पूर्णपणे फसवणूक झालीय हे लक्षात आल्यानंतर त्याने आपल्या पत्नीला घडल्या प्रकाराची कल्पना दिली व तिच्या सल्ल्यावरुन पोलिसात तक्रार दाखल केली. बँकरने दिलेल्या माहितीच्या आधारे पुढील तपास करत आहे.